रत्नागिरी: बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि ग्राहकांचे हित जपणारी संस्था म्हणून ख्याती असलेल्या स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने पुन्हा एकदा आपल्या यशाची मोहर उमटवली आहे. संस्थेच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष उपक्रमाला ठेवीदार आणि ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. २० जून ते २० जुलै या अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत संस्थेच्या तिजोरीत ३४ कोटी १९ लाख रुपयांच्या नव्या ठेवी जमा झाल्या असून, संस्थेच्या एकूण ठेवींनी ४४६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
एका महिन्यात तब्बल २६९ नवीन ठेवीदार जोडले
या मोहिमेदरम्यान केवळ मोठ्या रकमेच्या ठेवीच आल्या नाहीत, तर सर्वसामान्यांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. एका महिन्यात २,२२५ विविध खात्यांमध्ये नव्याने रकमा जमा झाल्या, तर २६९ नवीन ठेवीदारांनी आपले खाते उघडून पतसंस्थेशी नवीन नाते जोडले.
मोहिमेच्या सुरुवातीला (२० जून रोजी) पतसंस्थेच्या एकूण ठेवी ४१४ कोटी रुपये इतक्या होत्या. एका महिन्यात मिळालेल्या या उदंड प्रतिसादामुळे २० जुलै अखेर हा आकडा थेट ४४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. संस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये ग्राहकांचा हाच उत्साह पाहायला मिळाला. या दमदार घौडदौडीमुळे आता संस्थेने ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.
शून्य टक्के ‘एनपीए’ अन् भक्कम आर्थिक पाया
आजच्या स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक आर्थिक वातावरणातही स्वरूपानंद पतसंस्थेने आपली आर्थिक घडी अत्यंत मजबूत ठेवली आहे. संस्थेच्या उत्तम कामगिरीची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
-
वसूल प्रमाण: तब्बल ९९.७८% एवढी विक्रमी कर्ज वसुली.
-
एनपीए (NPA): थकबाकीचे प्रमाण शून्य टक्के (0%) राखण्याची गौरवशाली परंपरा कायम.
-
भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR): नियमानुसार आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी पट अधिक, म्हणजेच २७%.
-
बँक गुंतवणूक व कर्जवाटप: सुरक्षित गुंतवणुकीचा भाग म्हणून विविध बँकांमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक, तर गरजूंना आणि उद्योजकांना ३०७ कोटी रुपयांचे सुरक्षित कर्जवाटप.
“ठेववृद्धी मासाला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांनी स्वरूपानंद पतसंस्थेवर दाखवलेल्या दृढ विश्वासाचीच पोचपावती आहे. संस्थेची आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा यांमुळे हा विश्वास उत्तरोत्तर वाढतो आहे. ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांची पूर्ण सुरक्षा आणि त्यांना सर्वोत्तम सेवा देणे हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता राहील.”
— ॲड. दीपक पटवर्धन (अध्यक्ष, स्वरूपानंद पतसंस्था)

