कोकण रेल्वे प्रशासनाकडून यंदाच्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठी भेट; चिपळूण आणि खेडसाठी मेमू ट्रेन धावणार
आगामी गणेशोत्सवासाठी आता अवघा एक महिना उरला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात राहणाऱ्या कोकणवासीयांना वेध लागले आहेत ते आपल्या गावी जाण्याचे. या काळात नियमित रेल्वे गाड्यांवरील होणारी तुफान गर्दी आणि तिकिटांची होणारी मारामारी लक्षात घेता, कोकण रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर तब्बल २४६ विशेष गाड्या सोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या २४६ गाड्यांमध्ये १८४ आरक्षित विशेष गाड्या आणि ६२ अनारक्षित मेमू (MEMU) ट्रेनचा समावेश आहे. विशेष म्हणजे खेड आणि चिपळूणच्या प्रवाशांसाठी ‘दिवा’ स्थानकावरून थेट मेमू गाड्या चालवल्या जाणार आहेत.
प्रवासाचे नियोजन: मुख्य मार्ग आणि फेऱ्यांची संख्या
मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), पुणे आणि दिवा येथून या गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये CSMT हून एकूण ९८ फेऱ्या, LTT हून ७६ फेऱ्या, तर पुण्यावरून १० फेऱ्या चालवल्या जातील.
खालील तक्त्यावरून तुम्ही तुमच्या सोयीचा मार्ग व फेऱ्यांची माहिती घेऊ शकता:
| मार्ग (Route) | फेऱ्यांची एकूण संख्या |
| सीएसएमटी – सावंतवाडी रोड | ६६ फेऱ्या |
| सीएसएमटी – रत्नागिरी | ३२ फेऱ्या |
| एलटीटी – सावंतवाडी रोड | ४६ फेऱ्या |
| एलटीटी – रत्नागिरी | २२ फेऱ्या |
| एलटीटी – मडगाव | ८ फेऱ्या |
| पुणे – रत्नागिरी | १० फेऱ्या |
| दिवा – खेड (मेमू ट्रेन) | ३२ फेऱ्या |
| दिवा – चिपळूण (मेमू ट्रेन) | ३० फेऱ्या |
१ ऑगस्टपासून आरक्षण सुरू! तिकिटे कशी बुक कराल?
गणेशोत्सव विशेष आरक्षित गाड्यांचे तिकीट बुकिंग १ ऑगस्ट २०२६ पासून अधिकृतपणे सुरू होत आहे.
-
ऑनलाइन बुकिंग: प्रवासी आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थळावरून तसेच मोबाईल अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकतात.
-
ऑफलाइन बुकिंग: रेल्वे स्थानकांनावरील संगणकीकृत आरक्षण केंद्रांवरून (PRS) तिकिटे उपलब्ध होतील.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता अधिक गाड्यांची शक्यता:
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या गर्दीचा आढावा घेऊन आणि मागणी वाढल्यास मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याबाबतही सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी वेळेवर तिकिटे बुक करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

