HomeRatnagiriथकीत बिल भरा किंवा स्मार्ट मीटर बसवा! गुहागर महावितरणचा ग्राहकांना अजब सल्ला

थकीत बिल भरा किंवा स्मार्ट मीटर बसवा! गुहागर महावितरणचा ग्राहकांना अजब सल्ला

गुहागरमध्ये वीजबिल थकबाकीवरून महावितरणची नोटीस; स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव टाकत असल्याचा ग्राहकांचा आरोप.

गुहागर (रत्नागिरी): राज्यभरात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यावरून आधीच नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजी पाहायला मिळत असतानाच, आता गुहागरमध्ये महावितरणच्या एका अजब कारभारामुळे नवा वाद उफाळून आला आहे. “थकीत वीज बिल त्वरित भरा किंवा त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवून सहकार्य करा,” असा नोटीसवजा सल्ला गुहागर महावितरण कार्यालयाने स्थानिक वीजग्राहकाला पत्राद्वारे दिला आहे. या प्रकारामुळे थकीत बिलाच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अप्रत्यक्षरीत्या स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

गुहागर येथील एका ग्राहकाला महावितरणकडून नुकतेच एक पत्र बजावण्यात आले. या पत्रानुसार, संबंधित ग्राहकाचे मार्च आणि एप्रिल २०२६ या महिन्यांचे वीज बिल निर्धारित मुदतीत जमा झाले नव्हते; ते नंतर ४ मे २०२६ रोजी एकत्रित भरण्यात आले. मात्र, सध्या जुलै २०२६ चे ६,३२५ रुपये थकीत असून, जुलै व ऑगस्ट महिन्यांचे मिळून एकूण ११,९०० रुपयांचे देयक बाकी आहे.

मुंबई मुख्यालयातून थकीत ग्राहकांची यादी

पत्रात नमूद केल्यानुसार, मार्च व एप्रिल २०२६ या कालावधीत वेळेत बिल न भरणाऱ्या ग्राहकांची एक विशेष यादी महावितरणच्या वांद्रे (मुंबई) येथील मुख्य कार्यालयातून तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये नाव असल्याने वरिष्ठ पातळीवरून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे ग्राहकाने थकीत बिल भरावे आणि आपल्या वीज जोडणीवर लवकरात लवकर स्मार्ट मीटर बसवून घ्यावे, असे या पत्रात थेट सुचवण्यात आले आहे.

शंका असल्यास ८ ते १० दिवसांचे ‘डेमो प्रात्यक्षिक’

स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात फास्ट रीडिंग किंवा जास्तीचे बिल येण्याबाबत अनेक शंका आहेत. हे लक्षात घेऊन महावितरणने पत्रात एक पर्यायही दिला आहे. जर मीटरच्या कार्यपद्धतीवर शंका असेल, तर सध्याच्या नियमित मीटरच्या सिरीजमध्ये नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवला जाईल. पुढील ८ ते १० दिवस हा मीटर निरीक्षणासाठी ठेवला जाईल आणि वीजवापराचे थेट प्रात्यक्षिक (डेमो) दाखवून ग्राहकांच्या शंका दूर केल्या जातील.

सहकार्य न केल्यास कारवाईचा इशारा

शंका निरसनाची तयारी दर्शवतानाच महावितरणने शेवटी कारवाईचा इशारा देण्यासही कसर सोडलेली नाही. ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा प्रचलित नियमांनुसार वीजपुरवठा खंडित करणे किंवा अन्य कायदेशीर कारवाई करणे अपरिहार्य ठरेल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी थेट स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करणे किंवा तसा सल्ला देणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता सामान्य वीज ग्राहक आणि स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular