मुंबईतील कुर्ला येथे एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या केल्याची घटना काल घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत काही तासांतच तरुणीची हत्या करणारा तिचा प्रियकर रिझवान शेख आणि त्याचा मित्र फैजल शेख या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींचा जबाब नोंदवत असताना आरोपींनी पोलिसांसमोर धक्कादायक घटनाक्रम कथन केला. आरोपींनी पीडित तरुणीवर आधी बलात्कार केला. एवढ्यावरच नराधम थांबले नाहीत. बलात्कार केल्यानंतरही त्यांची क्रूरता थांबली नाही त्यांनी तरुणीच्या अंगावर २६ वेळा चाकूने वार केले. त्यानंतर हातोडीने तिचे डोके फोडले. त्यामध्ये तरुणीचा एक डोळाही बाहेर आला होता.
इमारतीच्या टेरेसवर त्या परिसरातील काही मुले गुरुवारी सायंकाळी टिकटॉक व्हिडीओ करण्यासाठी गेली. टेरेसवर दुर्गंधी पसरल्याने त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना एका तरुणीचा मृतदेह आढळला. या मुलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
तरुणीचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. या तरुणीचे वय २० ते २५ वर्षे वयोगटातील असून डोक्यात आणि गळयावर वार करून हत्या करण्यात आली. इतकेच नाही तर हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. या अहवालानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. तिची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. तपासाकरिता पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी देवनार आणि कुर्ला परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. रिझवान शेख, फैझल शेख अशी या दोघांची नावे असून रिझवान आणि या तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. ही तरुणी लग्नासाठी रिझवानकडे सारखी मागणी करत होती. परंतु, रिझवान याला तिच्याशी लग्न करायचे नसल्याने याने मित्र फैझल याला सोबत घेऊन या तरुणीची हत्या केल्याचे तपासातून उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.