चिपळूण: प्रवासाची घाई, हातातील सामान आणि बस सुटण्याची भीती… त्यातच आपली गाडी नक्की कोणत्या फलाटावर (प्लॅटफॉर्मवर) उभी आहे हे सांगणारा साधा फलकही नसेल, तर प्रवाशांची काय अवस्था होईल? असाच त्रासदायक अनुभव सध्या चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या शेकडो प्रवाशांना रोज घ्यावा लागत आहे. स्थानकातील फलाटांवर मार्गदर्शक किंवा क्रमांकांचे फलक नसल्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडत असून, या गंभीर समस्येकडे एसटी प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी आता पुढे आली आहे.
जुनी इमारत पाडली, पण मूलभूत सुविधांचे काय?
काही महिन्यांपूर्वी चिपळूण बस स्थानकातील जुनी इमारत पाडण्यात आली. त्यानंतर सध्या पूर्वीच्या फलाटांपैकी केवळ तीनच फलाट प्रवाशांसाठी सुरू ठेवण्यात आले आहेत. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वच लांब पल्ल्याच्या व स्थानिक बसेसचे नियोजन याच तीन फलाटांवरून केले जात आहे.
वाहतूक नियंत्रक (कंट्रोलर) नियमाप्रमाणे बस आल्याची उद्घोषणा (अनाउन्समेंट) करतात आणि अमुक एका फलाटावर गाडी उभी असल्याचे सांगतात. परंतु, प्रत्यक्ष त्या तिन्ही फलाटांवर कोणताही क्रमांक किंवा दिशादर्शक फलक लावलेला नाही. यामुळे विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना गाडी नेमकी कुठे लागली आहे हे शोधताना अक्षरशः धावपळ करावी लागत आहे.
विचारणा करेपर्यंत बस निघून जाते!
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले असलेल्या प्रवाशांचे यामुळे सर्वाधिक हाल होत आहेत. उद्घोषणा ऐकल्यानंतर नेमकी बस कोणत्या बाजूला उभी आहे हे विचारण्यासाठी प्रवासी नियंत्रण कक्षाकडे धाव घेतात. मात्र, गर्दीतून जाऊन कर्मचाऱ्यांना विचारून खात्री करेपर्यंत अनेकदा बस स्थानकातून निघून गेलेली असते. ऐन मोक्याच्या क्षणी गाड्या चुकल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तोंडी सूचनेनंतरही प्रशासन ढिम्म; अखेर लेखी निवेदन
या प्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी सुमारे आठ दिवसांपूर्वी स्थानिक आगार प्रमुखांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. प्रवाशांची होणारी ही गैरसोय थांबवण्यासाठी फलाटांवर साधे फलक लावण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र, आठवडा उलटूनही एसटी प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.
प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे संतप्त होऊन अखेर नित्यानंद भागवत यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रवाशांचा हा दैनंदिन गोंधळ थांबवण्यासाठी प्रशासनाने दिरंगाई न करता तत्काळ तिन्ही फलाटांवर स्पष्ट व ठळक फलक लावावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

