श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकामाचे शाखा अभियंता सरदेसाई यांची भेट घेत गोविंदगडावरील पाखाडीच्या सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करण्यासाठी माहिती दिली. पाखाडीचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसताच, पाखाडीच्या कामाबाबत गोवळकोट ग्रामस्थांनी ठेकेदारास विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
२५ नोव्हेंबरला श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान गोवळकोट-पेठमापचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्तांनी प्रत्यक्ष पाखाडीची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. येथील ऐतिहासिक गोविंदगडावर नागरिक तसेच पर्यटकांच्या सोयीच्यादृष्टीने जाण्या-येण्यासाठी पाखाडी बांधकामसाठी आमदार शेखर निकम यांनी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. या पाखाडीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या विरोधात श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागावर धडक दिली.
पाखाडीचे काम चांगल्या प्रकारे करण्याची मागणी ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार शाखा अभियंत्यांनी कामात दुरुस्ती करण्याची सूचना संबंधित ठेकेदारास करणार असल्याचे सांगितले. ठेकेदारास बोलावून योग्य ती समज द्यावी व दर्जेदार काम करण्याची मागणी पदाधिकाऱ्यानी केली.
काम घेणारे ठेकेदार जागेवर कधीच उपलब्ध नसतात. त्यानुसार १० डिसेंबरला झालेल्या देवस्थानच्या बैठकीत ठेकेदार मनोज जाधव यांना समक्ष बोलावून चौकशी करण्यात आली. ही पाखाडी मी दुरुस्त करून देतो, अशी त्यांनी ग्वाही दिली. संपूर्ण पाखाडी किती लांबी व रुंदीची आहे. पाखाडीसाठी किती डबर कुठे वापरावा. खडी, वाळू, सिमेंट यांचे प्रमाण किती, पाखाडीवर दिवसातून कितीवेळा पाणी मारावे, यावर कोणताही विचार केलेला नाही,असा समितीचा आक्षेप आहे.
काही ठिकाणी पायऱ्यांना डबर वापरलेलाच नाही तसेच पायऱ्यांचे टप्पे किती उंच व रुंदीचे असावेत याचाही विचार केलेला नाही. त्यामुळे पाखाडीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. असेच काम सुरू राहिल्यास जिल्हा नियोजनमधून मिळालेला २५ लाखाचा निधी वाया जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारास बिल देण्यापूर्वी संपुर्ण दुरुस्ती करून घेण्याची मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.