रत्नागिरी जिल्ह्यात कोकण कन्या एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे स्थानकाजवळ घडली. दोन तासांपासून कोकणकन्या एक्सप्रेस एकाच ठिकाणी रखडली होती. यानंतर प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी-कोकण कन्या एक्सप्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनला नवीन इंजिन जोडण्यात आले आणि बंद पडलेली कोकण कन्या एक्सप्रेस निवसर स्थानकात आणण्यात आली.
रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला असल्याने कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विलंबाच्या त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कोकणकन्या गोव्यापासून साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली. मात्र इंजिनमध्ये नेमका कोणता बिघाड झाला आहे, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
नवीन इलेक्ट्रिक इंजिनच्या माध्यमातून कोकण कन्या एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली. इंजिन बंद पडल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विविध स्टेशनमध्ये अडकून पडल्या होत्या. तुतारी, मंगला एक्सप्रेस या गाड्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज पर्यंत अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. तेथेच असलेल्या एका मालगाडीच्या विजेचे इंजिन पुढील प्रवासासाठी या गाडीला जोडावे लागले.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे गेल्या १ मेपासून कोकण रेल्वे मार्गावरील १० गाड्या विद्युत इंजिनसह धावणार होत्या. मात्र काही कारणामुळे हा मुहूर्त साधला गेला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसचेच इंजिन निवसर ते आडवली दरम्यान बिघडले आणि नेमकं त्याच वेळी या मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीचे विजेचे इंजिन काढून ते कोकणकन्या एक्स्प्रेसला जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना करण्यात आली.