वानर, माकडांची नसबंदी किंवा मारणे हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो मंत्रालयात प्रलंबित आहे. त्याला कालावधी लागण्याची शक्यता आहे. आम्ही मोठा पिंजरा बनवून त्यात केळशी येथे २० माकडे पकडून चाचणी घेतली आहे. जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा यासाठी २३ जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. निधी मिळाला की, लगेच वानर, माकड पकडण्याची सुरुवात गोळप गावातून करू, असे आश्वासन विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे यांना दिले. वानर, माकडांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या विरोधात ठोस निर्णय घेण्यासाठी लढा देणारे गोळप येथील अविनाश काळे यांनी गोळप येथून पदयात्रा काढून रत्नागिरीत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
त्यामध्ये वानर आणि माकडांबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आत्महत्येची परवानगी द्यावी, असे निवेदनात त्यांनी नमूद केले आहे. या प्रसंगी कुवारबाव, गावखडी, कोळंबे, पूर्णगड, जांभूळआड, गोळप, नाटे, गुहागर, कुर्धे, पावस, नेवरे आदी गावातील पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. रत्नागिरीत पोहोचल्यावर पालकमंत्री शहरात कार्यक्रमात व्यस्त असल्याने प्रथम त्यांच्या कार्यालयात मी कुटुंबासह आत्महत्येची परवानगी द्या, असे पत्र दिले. जिल्हाधिकारी यांची बैठक सुरू असल्याने कार्यालयात चिटणीस शाखेत पत्र दिले. बाकी सगळ्यांची पत्र नोंदणी शाखेत दिली.
विभागीय वनाधिकारी खाडे आणि परिक्षेत्र वनाधिकारी सुतार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले असल्याने तिथेच भेट झाल्याचे काळे यांनी सांगितले. वानर, माकडांची नसबंदी किंवा मारणे हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो मंत्रालयात प्रलंबित आहे. त्याला कालावधी लागण्याची शक्यता आहे; मात्र संभाजीनगर येथे सुतार आणि त्यांची टीम वानर, माकड पकडण्याचे प्रशिक्षण घेऊन आली आहेत. आम्ही मोठा पिंजरा बनवून त्याची केळशीत चाचणी घेतली आहे. जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा यासाठी २३ जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. निधी मिळाला की, लगेच आपण जिल्ह्यातील वानर, माकड पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी आपल्या गावापासून सुरुवात करू, असे खाडे यांनी आश्वासन दिल्याचे काळे यांनी सांगितले.