मंडणगड खेड आणि दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी रत्नागिरीमध्ये हळद लागवड केली असता कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते याबाबत पत्रकार परिषद घेतली. कोकणामध्ये शेतीचा हंगाम सुरु होण्यास काहीच अवधी राहिला आहे. त्यामुळे रोजच्या भातशेती प्रमाणे रत्नागिरीतील शेतकर्यांनी पर्यायी पिक म्हणून हळदीची लागवड करून पाहायला हरकत नाही. कोकणाचे वातावरण सर्व प्रकारच्या लागवडीसाठी पूरक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामूळे जे काही कसू, त्यामध्ये सोनच उगवणार याची खात्री दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील बर्याच प्रमाणातील जमीन ही शेतीसाठी किंवा इतर काही उत्पन्न घेण्यासाठी पूरक आहे, परंतु काही ठिकाणी वन्य भाग जवळ असल्याने होणारा वन्य पशूंचा त्रास, जसे कि शेतीच्या हंगामाला वानर, हत्ती, डुक्कर, अगदी काही प्रमाणामध्ये पक्षांचे थवेच्या थवे सुद्धा येऊन शेतात धुडगूस घालून शेतीची नासधूस करतात. तर काही ठिकाणी जाणवणारा पाण्याचा तुटवडा त्यामुळे देखील भातशेती शिवाय दुसरे कोणतही उत्पन्न घ्यायला शेतकरी पुढे यायला धजावत नाही. किंवा कोणते नवीन पिक घेतले तर त्याचे उत्पन्न चांगलेच येईल याबद्दल संभ्रम अवस्था असल्याने शेतकरी पोटापुरते उत्पन्न काढून बाकीचा हंगाम ती जमीन न कसता तशीच ठेवून देतात.
परंतु आमदार योगेश कदम यांनी या पत्रकार परिषदेमध्ये हळदीच्या लागवडीचे अनेक फायदे स्पष्ट केले आहेत. हळदीचे पिक हे कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगले येऊ शकते. त्यासाठी जरी काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी असला तरी त्यातून येणारे उत्पन्न हे लाखामध्ये मिळू शकते. हळदीचे एक ना अनेक उपयोगी गुणधर्म सर्वांनाच माहित आहेत, तसेच भारत आणि अगदी परदेशामध्ये सुद्धा हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे आंबा, काजूचा हंगाम संपल्यावर येणाऱ्या पावसामध्ये बागांमध्ये हळदीची लागवड करून त्याचे उत्पन्न घ्यावे, पाऊस असल्याने लागणाऱ्या पाण्यासाठी वेगळा खर्वः उचलण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे केलेली ही लागवड नक्कीच फायदेशीर ठरू शकते असे आ. कदम यांनी सांगितले.