खेड तालुक्यातील भेलसईनजीक २ लाख ३१ हजार ८४० रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह २ लाख ५० हजार रुपये किंमतीची झायलो कार असा एकूण ४ लाख ८१ हजार ८४० रुपयांचा ऐवज येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केला. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० च्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली.
सुमित संतोष गोरिवले (२७, रा. भेलसई गोरिवलेवाडी), राजाराम तानाजी जोईल (५२,रा. खेर्डी-चिपळूण), दिनेश दगडू कदम (४०, रा. वालोपे- बेंडकरवाडी, चिपळूण), सुधाकर कदम (रा. भेलसई गंगवाडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस निरिक्षक नितिन भोयर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. महिंद्रा कंपनीच्या झायलो कारमधून ते गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला होता. पहाटेच्या सुमारास भेलसईनजीक मद्यसाठ्याची वाहतूक करताना चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले.