24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriरत्नागिरी मतदारसंघात राजकीय साखरपेरणी

रत्नागिरी मतदारसंघात राजकीय साखरपेरणी

मतदारसंघातील विकासकामाच्या जोरावर सामंत यांनी विधानसभा मतदारसंघावरील पकड मजबूत केली.

निवडणुकांचे बिगुल वाजले नसले तरीही सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेतृत्वाची लोकांपर्यंत पोचण्याची चढाओढ सुरू आहे. मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून मतदारसंघ ढवळून काढला जात आहे. यामध्ये शिंदे शिवसेनेच्या बरोबरीने ठाकरे शिवसेना आणि भाजपही सक्रिय झाले असून, मतदारसंघात राजकीय साखरपेरणी जोरात सुरू आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये २००४ ला शिवसेना- भाजप युतीद्वारे निवडणूक लढवली गेली होती. त्या वेळी भाजपचे उमेदवार रिंगणात होते; मात्र अंतर्गत बंडाळीमुळे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदय सामंत यांनी विजय मिळवला. त्यानंतर सततच्या निवडणुकीत सामंत यांनी विजयी पंरपरा कायम ठेवली.

मतदारसंघातील विकासकामाच्या जोरावर सामंत यांनी विधानसभा मतदारसंघावरील पकड मजबूत केली. २०१४ ला ते शिवसेनेकडून लढले आणि विजयी झाले. २०१९ लाही त्यांनी पुनरावृत्ती केली. मागील दोन वर्षांतील राजकीय स्थित्यंरात सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने उभे राहत ठाकरेंची साथ सोडली. सामंत यांचा वैयक्तिक संपर्क असल्यामुळे शिंदे शिवसेनेचे आव्हान कायम आहे. कोकणात ठाकरेंचे वर्चस्व असल्यामुळे राजकीय दुफळीचा भविष्यात परिणाम होऊ नये यासाठी जनसंपर्क तुटणार नाही, याची खबरदारी मंत्री सामंत यांच्याकडून घेतली जात आहे. त्यासाठी दर शनिवार, रविवार ते मतदारसंघात कार्यरत असतात.

गेल्या काही दिवसांमध्ये सामंत यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मंगळागौर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. मंत्री सामंत यांचे वाढते प्रस्थ मोडीत काढण्यासाठी ठाकरे गटही सरसावला आहे; परंतु ठाकरे गटाकडून अजूनही विधानसभेचा उमेदवार जाहीर झालेला नाही. तरीही निष्ठावंत शिवसैनिक उदय बने यांना रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही तशी चर्चा आहे. बनेही तालुका पिंजून काढत असून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात मंगळागौर कार्यक्रम आयोजित केले गेले.

जिल्हा परिषद गटनिहाय हे कार्यक्रम यशस्वीपणे राबवले गेले. भाजपकडून विधानसभा क्षेत्र प्रमुखपदावर बढती मिळालेले बाळ माने सक्रिय झाले असून, टिफिन बैठकांच्या माध्यमातून ते मतदार संघ पिंजून काढत आहेत. रत्नागिरीच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊया आणि रत्नागिरीला बलशाली बनवूया, असा संदेश ते गावागावात घेऊन जात आहेत. त्यांच्याकडूनही ग्रामीण भागात मंगळागौर कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. शिवसेनेकडून उदय सामंत, ठाकरे गटाकडून उदय बने आणि भाजपकडून बाळ माने हे कार्यक्रमांमधन मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular