भातबियाण्यांचे ५२ टन इतके उत्पादन, बारीक दाण्याच्या बियाण्याला मागणी…

123
Production of 52 tons of paddy seeds

कोकणात मे महिना म्हटलं की, येथील शेतकरी भातबियाण्याच्या शोधात असतो. कोकणच्या हवामानात पावसाळ्यामध्ये भातपिकाशिवाय पर्याय नाही. भात खाचराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हळव्या, निमगरव्या व गरव्या जातीची मागणी शेतकरी करत असतात. आजकाल येथील संशोधन केंद्रातून तयार झालेल्या बारीक दाण्याच्या भातजातींच्या बियाण्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी केंद्रातून ५२.० टन भातबियाणे उत्पादन केले. कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक ६ टन भातबियाण्यांची मागणीची पूर्तता केली असल्याची माहिती शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येथील शिरगाव कृषी संशोधन केंद्रातून यावर्षी ५२.० टन बियाण्यांचे उत्पादन करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी-८, रत्नागिरी- २४, रत्नागिरी-१, रत्नागिरी-६, रत्नागिरी- ७ (लाल तांदूळ) या जातींचे बियाणे मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आले. मे महिन्याच्या अगोदरपासूनच शिरगाव संशोधन केंद्राकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात ४ टन तर तालुक्यात दीड टन बियाण्याची विक्री झाली आहे. ठाणे- १ टन, रायगड- १ टन तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रातून तयार झालेल्या रत्नागिरी – २४ आणि रत्नागिरी-१ या भातजातीच्या सर्वाधिक ६ टन म्हणजेच १२० दिवसात होणारे तसेच बियाण्याची विक्री झाली आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती येथील हवामानाचा विचार करून शेतकरी हळव्या जातीचे बियाणे निमगरव्या जात १२० ते १३५ दिवसात होणाऱ्या भातजाती तसेच गरव्या म्हणजेच १३५ दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणाऱ्या भातबियाण्यांचा वापर करत आहेत. संशोधन केंद्रात आजच्या घडीला रत्नागिरी- २४, रत्नागिरी-७ व रत्नागिरी- १ या तीन भातजातीचे बियाणे अनुक्रमे ३०० किलो, १०० किलो व २०० किलो एवढेच शिल्लक असून संपूर्ण बियाण्याची विक्री झाली आहे.

विद्यापीठ विकसित बियाण्याला मागणी – शिरगाव संशोधन केंद्राच्या शंभर वर्षाच्या कार्यकाळात केंद्राने निर्माण केलेल्या भात, भुईमूग पिकाच्या विविध जाती शेतकऱ्यांसाठी दिल्या आहेत तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनही करण्यात येत आहे. सद्यस्थितीला केंद्राकडे १२ भातजाती उपलब्ध आहेत; मात्र अलीकडे कृषी संशोधन केंद्रातून लोकप्रिय शेतकऱ्यांच्या आवडीच्या विद्यापीठाने विकसित केलेल्या भातबियाण्यांची मागणी वाढताना दिसत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.