राजापूर: मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकावर बुधवारी (१ जुलै) सायंकाळी एका चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल असा थरार पाहायला मिळाला. रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहून घाबरलेला एक प्रवासी अचानक पळू लागला आणि जवळच्याच एका घरात घुसला. तिथे त्याने हातात कोयता आणि घण घेऊन घरातील लोकांनाच धमकावण्यास सुरुवात केली. काही तास चाललेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर अखेर संतप्त ग्रामस्थांनी मागचा दरवाजा तोडून त्याला पकडले, चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. तालुक्यातील सोल्ये रेल्वे स्थानकाजवळील फणसवाडीत हा सगळा प्रकार घडला.
घरात वृद्ध महिला एकटीच असताना संशयिताचा प्रवेश
बुधवारी सायंकाळी मुंबईहून आलेली मांडवी एक्स्प्रेस राजापूर रोड स्थानकावर थांबली. त्यातून हा प्रवासी खाली उतरला. स्थानकाबाहेर पडताच त्याला पोलिसांची गाडी आणि बंदोबस्त दिसला. पोलिसांना पाहताच त्याचे धाबे दणाणले आणि तो तिथून थेट पळत सुटला. पळत पळत तो जवळच राहणाऱ्या प्रकाश श्रृंगारे यांच्या घरात शिरला.
त्यावेळी नशिबाने प्रकाश श्रृंगारे आणि इतर कुटुंबीय शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते, तर त्यांची वृद्ध आई घरात एकटीच होती. घरात घुसताच त्या अज्ञात व्यक्तीने तातडीने मुख्य दरवाजा आतून बंद केला. एवढ्यावरच न थांबता त्याने घरातील कोयता आणि घण (मोठा हातोडा) हातामध्ये घेतला आणि वृद्ध महिलेला धमकावण्यास सुरुवात केली.
पोलीस आणि ग्रामस्थांचे प्रयत्न ठरले अपयशी
काही वेळातच ही माहिती प्रकाश श्रृंगारे आणि इतर ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी तातडीने घराकडे धाव घेतली आणि खिडकीतून त्या व्यक्तीला समजावण्याचा, दरवाजा उघडण्यास सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. परिस्थिती गंभीर होत चालल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते शशिकांत प्रभुदेसाई यांना बोलावण्यात आले. त्यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.
पोलीस आणि प्रभुदेसाई यांनी त्या प्रवाशाला “शरण ये, दरवाजा उघड” असे वारंवार आवाहन केले, पण त्याने आतून धमक्या देणे सुरूच ठेवले. काही वेळात राजापूर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पथकही तेथे दाखल झाले. मात्र, कित्येक तास उलटूनही त्या व्यक्तीने दरवाजा उघडला नाही.
संयम सुटला आणि गावकऱ्यांनी मागचा दरवाजा फोडला
हा प्रकार वाऱ्यासारखा पसरल्याने फणसवाडीत लोकांची मोठी गर्दी जमली होती. कित्येक तास पोलीस फक्त विनंती करत असल्यामुळे अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला. काही धाडसी ग्रामस्थांनी घराच्या मागच्या बाजूला जाऊन दरवाजा जोरदार धडका देऊन तोडला. घरात प्रवेश करताच त्यांनी त्या व्यक्तीला जागीच पकडले. स्वतःचा जीव धोक्यात घालून गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि संतप्त झालेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप दिला.
या संपूर्ण कारवाईनंतर ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी वेळेत ठोस पाऊल उचलले नाही, असा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, पकडलेल्या संशयिताला सरकारी वाहनातून न नेता खाजगी रिक्षाने पोलीस ठाण्यात पाठवल्यामुळेही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
संशयित रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात; तपासाचे मोठे आव्हान
जमावाच्या मारहाणीत संशयित प्रवासी जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो प्रवासी नेमका कोण आहे? पोलिसांना पाहून तो इतका का घाबरला? तो एखादा फरार गुन्हेगार आहे की घातपाताच्या उद्देशाने आला होता? या सर्व प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस त्याची कसून चौकशी करतील, त्यानंतरच या संपूर्ण थरारामागचे खरे सत्य समोर येईल.

