रत्नागिरी: कधीकधी एखाद्या व्यक्तीची मदत करणे आपल्याच अंगाशी येऊ शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील ५२ वर्षीय रामचंद्र चिंतामणी केळकर यांना आला आहे. रुग्णालयात रडणाऱ्या एका महिलेला माणुसकी दाखवून मदत करणाऱ्या केळकर यांना नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ मानसिक छळाला सामोरे जावे लागले. त्यांच्या एका संभाषणाची ऑडिओ क्लिप नातेवाईक आणि मित्रांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन एका टोळीने त्यांच्याकडून तब्बल १७ लाख ९ हजार ४९४ रुपयांची खंडणी उकळली. अखेर या त्रासाला कंटाळून केळकर यांनी पोलिसांत धाव घेतली आणि या मोठ्या ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला.
अशी झाली ‘त्या’ भयंकर जाळ्याची सुरुवात
ही घटना २२ जुलै २०२५ रोजी सुरू झाली. रामचंद्र केळकर हे त्यांच्या आजारी भावाला भेटण्यासाठी रत्नागिरी शहरातील एका रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांना सुरैय्या हकीम नावाची महिला रडताना दिसली. केळकर यांनी विचारपूस केली असता, “माझ्या मुलाच्या ऑपरेशनचे बिल भरायला पैसे नाहीत,” असे सांगून तिने भावनिक साद घातली. तिच्या अश्रूंना भुलून केळकर यांनी मदतीचा हात पुढे केला आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला.
त्याच दिवशी त्यांनी मारुती मंदिर परिसरात सुरैय्याला भेटून १,५०० रुपये रोख दिले आणि नंतर गुगल पे द्वारे ५०० रुपये पाठवले. मात्र, केळकर यांच्या याच संवेदनशीलतेचा फायदा घेण्याचे आरोपींनी ठरवले होते.
ऑडिओ क्लिपची धमकी आणि नऊ महिन्यांचा छळ
मदत केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केळकर यांना एका अनोळखी पुरुषाचा फोन आला. “तुमचे आणि सुरैय्याचे जे संभाषण झाले, त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. ते आम्ही तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना ऐकवू आणि तुमची समाजात बदनामी करू,” अशी धमकी त्याने दिली. समाजात आपले नाव खराब होईल या भीतीने घाबरलेल्या केळकर यांनी सुरुवातीला १० हजार रुपये दिले.
पण आरोपींची हाव एवढ्यावरच संपली नाही. २२ जुलै २०२५ ते १९ मे २०२६ या नऊ महिन्यांच्या काळात आरोपींनी केळकर यांना सतत फोन करून प्रचंड मानसिक दडपणाखाली ठेवले. बदनामीच्या भीतीपोटी केळकर यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवरून आणि गुगल पे च्या माध्यमातून तब्बल १७ लाख ९ हजार रुपयांहून अधिक रक्कम आरोपींना पाठवली.
मानसिक छळाला कंटाळून अखेर पोलिसांत धाव
आरोपींची पैशांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. शेवटी हा मानसिक त्रास सहन न झाल्याने आणि आर्थिकदृष्ट्या खचल्यामुळे केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला.
पोलिसांची धडक कारवाई; चौघे गजाआड
रामचंद्र केळकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. या ब्लॅकमेलिंग प्रकरणात गुंतलेली मुख्य संशयित महिला सुरैय्या हकीम, तिच्यासोबत असणारे हुसेन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व राहणार रत्नागिरी) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून या चारही आरोपींना तत्परतेने अटक केली. न्यायालयाने या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

