कोकण आणि पर्यटक यांचे एक वेगळेच समीकरण आहे. प्रत्येक विकेंड अथवा मोठ्या लागून येणाऱ्या एकत्रित सुट्ट्यांमध्ये कोकणचा रस्ता धरणारी अनेक मंडळी आपण पाहतो. सध्या कोकण पर्यटनाला कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंदी घालण्यात आलेली आहे. कोकणामध्ये असणार्या विविध पर्यटन स्थळांना जगभरातील लोकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनस्थळांमध्ये अजून वाढ कशी करता येईल यासाठी कोणती अद्ययावत यंत्रणा अवलंबता येईल यासाठी अनेक अधिकारी जातीने लक्ष घालत असतात.
नाम. उदय सामंत यांनी रत्नागिरीमधील आरे-वारे या पर्यटनस्थळ जवळील परिसरामध्ये असणाऱ्या ढोकमळे येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पामधील प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव १ जुलैपर्यंत सेन्ट्रल झू ऑथोरिटीला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हे प्राणिसंग्रहालयाची उभारणी २० एकर जागेमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असणारी जमीन मोजणीची प्रक्रिया कोरोनामुळे स्थगित झाली आहे. परंतु, नेक काम मे देरी क्यू ! असा विचार करत आसपासच्या जागेमधील हिस्सेदाराना जमिनीबाबत नोटीस पाठवून, १५ जूनपासून जागेची मोजणी करून प्राणी संग्रहालयाच्या कामाची सुरुवात वेगाने करण्याचे योजिले आहे.
उदय सामंत यांनी यासंदर्भात व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज बैठक घेतली. या बैठकीला संबधित क्षेत्रातील सर्व अधिकारी आणि काही कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये सामंत म्हणाले कि, कोरोनामुळे तालुक्यातील अनेक प्रकल्पांची कामे रखडली गेली आहेत आणि ती वेळीच मार्गी लावणे गरजेचे आहे. यासाठी ही ऑनलाईन कॉन्फरन्स घेण्यात आली. या प्रकल्पाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले कि, या प्राणिसंग्रहालयामध्ये साधारण विविध ४५ प्रकारचे प्राणी असणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी अंदाजे येणारा खर्च ३५ कोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.