HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा न्यायालयात बॉम्बची धमकी; परिसर रिकामा, पोलिसांकडून तपास सुरू

रत्नागिरी जिल्हा न्यायालयात बॉम्बची धमकी; परिसर रिकामा, पोलिसांकडून तपास सुरू

ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी; डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी.

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मेल समोर येताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडवर आली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विलंब न लावता न्यायालयाची मुख्य इमारत आणि संपूर्ण परिसर पूर्णपणे रिकामा करून मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे.

श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित श्वान पथक (डॉग स्कॉड) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून न्यायालयाची इमारत, आवार तसेच परिसरातील प्रत्येक कोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे. न्यायालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

मॉक ड्रिल की घातपाताचा कट? गूढ कायम

सध्या सुरू असलेली ही तपासणी पोलीस यंत्रणेचा एखादा सुरक्षा सराव (मॉक ड्रिल) आहे की खरोखरच कोणी घातपाताचा कट रचून धमकीचा मेल पाठवला आहे, याबाबत अद्याप पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कसून तपासणी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच यामागचे सत्य स्पष्ट होईल.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: पोलिसांचे आवाहन

न्यायालय परिसरात पोलिसांची अचानक झालेली वर्दळ, सायरन वाजवणाऱ्या गाड्या आणि डॉग स्कॉडमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणाखाली असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular