डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु आहे. शेती आणि शेतीशी निगडीत अनेक संशोधन इथे केले जातात. शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक उपक्रम या विद्यापीठामार्फत राबविले जातात. शेतीचा मौसम सुरु व्हायला आता कमीच अवधी राहिला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी भात शेतीला जोड व्यवसाय म्हणून काय काय पर्याय उपलब्ध आहेत, याबाबत एक ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी “पावसाळी भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान” यावर आधारित एक वेबिनार आयोजीत केला होता. या वेबिनारमध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी वेबिनारच्या विषयाला अनुसरून, सर्व शेतकऱ्याना व्यापारी दृष्टीकोन ठेऊन भाजीपाल्याची लागवड करण्याचे सुचविले आहे. आजकाल शेतकरी फक्त कुटुंबापुरत उत्पन्न घेऊन बाकीचा हंगाम सुद्धा एखाद्या भाजीपाल्याची लागवड केली तर केली नाहीतर पूर्ण शेतजमीन तशीच ओसाड टाकतात. त्यामुळे जमिनीच्या पोतावर सुद्धा परिणाम होतो.
त्यामुळे डॉ. सावंत यांनी सांगितले कि, भाजीपाल्याचे उत्पादन घेताना सुद्धा, प्रथम बाजारामध्ये जाऊन कोणत्या भाजीला जास्त मूल्य आहे, कोणत्या भाजीची विक्री जास्त प्रमाणात होते, गिर्हाईकांचा कोणत्या भाजीपाल्याची खरेदी करण्याकडे कल आहे याचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची बियाणी, त्यावर पडणारे रोग, त्यावरील उपाययोजना, वापरण्यात येणारी जैविक किंवा रासायनिक खते याबाबत नवनवीन माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आलेल्या उत्पन्नाची विक्री कशाप्रकारे करावे यासाठी असणारे विविध मार्ग जाणून घ्यावे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर शेती आणि भाजीपाल्याच्या लागवड, उत्पादन आणि विक्रीसाठी केला असता फायदेशीर ठरू शकते. विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. कदम यांनी भाजीपाला पिकांवर पडणारा रोग यावर मार्गदर्शन केले. उद्यानविद्या महाविद्यायालातील प्रा.परुळेकर यांनी भेंडी आणि पालेभाज्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामधील प्रा. डॉ. देसाई यांनी भाजीपाल्यावर पडणाऱ्या किडी आणि त्याच्या व्यवस्थापनेवर मार्गदर्शन केले.