जून महिन्यातील तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे वेळापत्रक १५ दिवसांनी पुढे गेले आहे. जून महिन्यात सरासरीनुसार ३० टक्के तर गतवर्षीच्या तुलनेत २०० मिमी कमी पाऊस झाला आहे. मागील दहा दिवसात समाधानकारक पडलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, १५०० हेक्टरवर भात लागवड झाली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत मिमी ६८० मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत ८२२ मिमी पाऊस झाला होता. यंदा तुलनेत २०० मिमी कमी पाऊस झाला. जून महिन्यात सरासरी ८०० मिमी पाऊस पडतो. यावर्षी तो ३० टक्के कमी पडला आहे. मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी जिल्हावासीयांना प्रतीक्षा करावी लागली.
पहिल्या आठवड्याच्या शेवटी काही ठिकाणी हलका पाऊस पडून गेला होता. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तातडीने पेरण्या करून घेतला. सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या करून घेण्यात आल्या; मात्र पुढे पावसाने विश्रांती घेतली आणि उन्हाचा कडाका सुरू झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लांबले. साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असले तरीही पेरण्यांसह भातलागवडीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड होते. रोपवाटिकांसाठी सरासरी सात हजार हेक्टरवर पेरण्या केल्या जातात. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उशिराने केल्या.
२२ ते २३ जूनला पावसाला सुरुवात झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ६० टक्के पेरण्या पूर्ण केल्या गेल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली आहे. कृषी विभागाकडील माहितीनुसार, आतापर्यंत १५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. उशिरा पेरणी केलेल्यांना अजून आठ ते दहा दिवस थांबावे लागणार आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत भात लागवडीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोसमी पावसाच्या विलंबामुळे भात लागवडीला उशीर झाला आहे. भविष्यात पाऊस अनियमित राहिला तर त्या दृष्टीने होणाऱ्या परिणामांचा वेध आतापासूनच घ्यावा लागणार आहे.