तालुक्यातील गणेशगुळे येथे बीएसएनएल फायबरची सुविधा विस्कळीत झाली आहे. नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. समस्यांविरोधात आज गणेशगुळ्यातील ग्रामस्थ धडकले. येत्या चार दिवसांत फायबरला व्यवस्थित इंटरनेट मिळायला लागेल. बीएसएनएलकडून पुरेसे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असे आश्वासन या वेळी अधिकाऱ्यांनी दिले. गणेशगुळ्यातील ग्रामस्थ गुरू नागवेकर, अभिजित नागवेकर, संजय चक्रदेव, प्रणव फडके, भूषण जोशी आदी ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी असिस्टंट जनरल मॅनेजर अमृता लेले, टेलिकॉम ऑफिसर स्वस्तिक चव्हाण आणि आदिती पंडित यांनी गणेशगुळ्यातील ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्या निवारण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
फायबर सुविधा पुरवण्याचे कामही कंत्राटदारांकडे दिले आहे. फेब्रुवारीमध्ये गणेशगुळे येथील ग्रामस्थांनी फायबर सुविधा घेतली. त्याकरिता प्रत्येकी ४ हजार रुपये भरले आहेत; परंतु सेवा विस्कळित असल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इंटरनेटला स्पीड नाही, कनेक्टिव्हिटी नसल्याने विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्ज भरणे किंवा अन्य कामे करता येत नाहीत. भरलेल्या रक्कमेतील २५०० रुपये कंत्राटदाराकडून ग्राहकाला परत मिळणार आहे. याबाबतही लवकरच कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दिले आहेत.
पावस येथे बँडविथ यंत्रणा नसल्याने गणेशगुळे येथे फायबरला इंटरनेट स्पीड मिळू शकत नाही. याकरिता दिल्ली येथे वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून ही यंत्रणा देण्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपासून केली आहे. रत्नागिरीतून चार ठिकाणी अशी यंत्रणा उभारून गणेशगुळ्याला इंटरनेट सुविधा दिली जाईल, असे या वेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य – ग्रामस्थांचे १०० टक्के सहकार्य बीएसएनएलला मिळते. टॉवर सुरू करणे किंवा फायबर सुविधेसाठीही सहकार्य केल्याचे ग्रामस्थ भूषण जोशी यांनी सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयातही इंटरनेट सुविधेत महावितरणचा अडथळा येत असल्याने दोघांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर गणेशगुळ्यातील बीएसएनएलच्या टॉवरची रेंज जात होती. हा प्रश्नही लवकरच सुटेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांचे बीएसएनएल विषयक सर्व प्रश्न लवकरच सुटतील, असे अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले.