29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeChiplunमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लवकरच सुरू - परशुराम घाट

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लवकरच सुरू – परशुराम घाट

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणांतर्गत सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले. एकेरी मार्ग पूर्णत्वास गेला असून, या आठवडाभरात त्यावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, डोंगराच्या बाजूने असलेले कातळ फोडण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे दुसऱ्या लेनसाठी अजूनही काही कालावधी लागेल. गेल्या तीन वर्षांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे २२ मीटर उंचीची दरड आणि दुसरीकडे खोल दरी व पायथ्याला गाव असल्याने अतिशय कठीण परिस्थितीत येथे काम करावे लागले. खेड हद्दीत कल्याण टोलवेज व चिपळूण हद्दीत इगल इन्फ्रा कंपनीमार्फत काम सुरू आहे; परंतु घाटातील डोंगरकटाईच्या कामातच वर्षभराचा कालावधी निघून गेला. आता दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत व चौपदरीकरणातील काँक्रिटीकरणाचे कामही टप्प्याटप्प्याने करण्यात आले. त्यातील एकेरी मार्ग पूर्णत्वाकडे गेला असून, केवळ १० मीटरचे काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे.

पावसाळा येऊन ठेपल्याने चौपदरीकरणाची घाई सुरू झाली आहे; परंतु कातळ फोडण्यासाठी केवळ एकच ब्रेकर उपलब्ध आहे. त्यामुळे या कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. मध्यंतरी दहा दिवस परशुराम घाटातील वाहतूक दिवसातून आठ तास बंद ठेवण्यात आली होती; परंतु या कालावधीतही खेड हद्दीतील कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. अजूनही कामासाठी पुरेशी यंत्रणा न लावल्याने मंद गतीने कामे सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीही चौपदरीकरणातील कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या; परंतु त्यांच्या सूचनांचा परिणाम झालेला अद्यापही दिसत नाही. दुसऱ्या मार्गावर काँक्रिटीकरण दोन दिवसांत हे काम पूर्ण करून आठवडाभरात एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेतले जाईल. गेल्या काही महिन्यांपासून परशुराम घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळाचा भाग दोन ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्याचे काम सुरू आहे. बहुतांश कातळ तोडला असला, तरी अद्याप रस्त्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. तसेच, गटार व संरक्षक भिंतीचे कामही शिल्लक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular