मागील दोन आठवडे चिपळूणमध्ये सुरु असलेल्या सावकारी धंद्याच्या चर्चेला उधाण आले आहे. चिपळूण मध्ये गेली ८-१० वर्षे सावकारी धंदा कोणालाही न जुमानता राजरोसपणे सुरु आहे. सध्या असणारी कोविड परिस्थिती लक्षात घेता, सावकारी धंदा जोशातच सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.
अनेक सावकार नागरिकांना पैशासाठी वेठीस धरत असल्याचे वृत्त कानावर येत आहे. चिपळूण शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात सावकारी व्यवसायाचे पेव वाढले आहे. या सावकारांनी पैसे वसुलीसाठी तरुण मुलांची टीम ठेवली असल्याने, राजरोस मोठ्या प्रमाणात नागरिकांना वसुली करणारे त्रास देत आहेत. सावकार कर्ज देताना गोड बोलून देतात, पण वसुलीच्या वेळी जबरदस्तीची भाषा वापरतात, फोनवर धमकावतात, प्रसंगी घरातील एखादी किमती वस्तू देखील उचलून नेतात.
चिपळूण सारख्या शहरामध्ये अनेक पतसंस्था, सहकारी संस्था,राष्ट्रीयकृत बँक आहेत, तरी पण अनेक लोक या अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या सावकारी धंद्यामध्ये अडकले जातात. सावकारी धंद्यामध्ये पैसे लगेच मिळतात, परंतु, वसुलीसाठी लावलेला तगादा नकोसा वाटतो. त्याचे नुकतेच एक उदाहरण सामोरे आले आहे. चिपळूण मधील एका रिक्षा व्यावसायिकाने सावकाराच्या धमक्यांना कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली.
त्या रिक्षा व्यावसायिकाने एक सुसाईड नोटमध्ये सावकारांची नावेही लिहिली आहेत. त्याचप्रमाणे, कोण धमकी देत, वसुली साठी सतत फोन करून त्रास देत या बद्दल सविस्तर माहिती सुसाईड नोटमध्ये व्यावसायिकाने लिहून ठेवले आहे. राजरोसपणे सुरु असलेल्या नक्की या सावकारी धंद्यांवर नक्की कोणाचा “वरदहस्त” आहे, अशी कुजबुज जनतेमध्ये सुरु आहे. रिक्षा व्यावसायिकाने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये असलेल्या सावकारांवर पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.