म ागील अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला, मात्र सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केले, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पन्नास खोके नव्हे तर तीन हजार खोके विकास कामांसाठी दिले, असे शिंदे म्हणाले. कोकणातील दोन कदम एकत्र आल्याने दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहील अशी कोपरखळी त्यांनी लगावली. उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील ३ माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाने कोकणात आणि छत्रपती संभाजी नगरात उबाठा गटाला खिंडार पडले.
संजय कदम यांचे शिवसेनेत स्वागत करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणातील एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहेत. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले. पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम कोकणात काम करत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी म ागील २५ वर्ष कोकणात काम केले. आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
कोकणातील भूमीपूत्रांना तिथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध. केल्या जातील, असे ते म्हणाले. शिवसेनेचे दोन कदम एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहणार असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबईतील भांडुपचे माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.