कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये दिवसेंदिवस होत चाललेली वाढ लक्षात घेता माजी खासदार तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव संजीव कुमार यांना पत्र व्यवहार केला आहे. त्यामध्ये त्यांनी रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन करून सुद्धा कोरोना रुग्ण संखेमध्ये घट झालेली दिसून येत नाहीत. मृत्युदर देखील कमी होत नसल्याने, या परिस्थितीला केवळ तीनही जिल्हाधिकारी जबाबदार असल्याची खरमरीत टीका निलेश राणेंनी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे पूर्व नियोजन केले नसल्याने आज कोरोना प्रादुर्भाव रोखणे स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर झाले आहे. त्यामुळे जनतेचे हाल न करता आता तीनही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या ताब्यात द्यावी, अश मागणीचे पत्र भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री श्री. हर्षवर्धन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव संजीव कुमार यांना दिले आहे.
कोविड -१९ महामारीची परिस्थिती हाताळताना स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष म्हणून तीनही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अपयशी ठरलेले दिसत आहेत. हे तीनही जिल्हे जरी भौगोलिक दृष्ट्या लहान असले तरी या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या सततच्या वाढीमुळे तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी देखील करण्यात आली आहे, परंतु तरीही रुग्णसंख्या वाढ जैसे थे आहे.
आत्ता सुरु झालेल्या पावसाळ्यात साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामधील आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घ्यावेत, तरच हि वाढत चाललेली संसर्गाची स्थिती आटोक्यात येईल. गेला आठवडाभर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे, तरीही परिस्थिती जर आटोक्यात येत नसेल तर जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाच्या जबाबदारीमध्ये कमी पडत असल्याचे दिसत असल्याने हे पत्र द्यावे लागत असल्याचे निलेश राणेंनी स्पष्ट केले. .