कोकणचे आकर्षण सर्वांनाच भुरळ पाडणारे असते. त्यामुळे मोठ्या सुट्ट्या किंवा नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक आवर्जून कोकणालाच पहिली पसंती देतात. अधिक प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्या कारणाने वाहनांची सुद्धा रेलचेल अधिक प्रमाणात होते. त्यामुळे पर्यटकांच्या सेवेसाठी आणि सुंदर रत्नागिरीचे दर्शन करण्यासाठी एसटी विभाग देखील पुढे सरसावला आहे,
रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेकरीता एसटी विभागही सज्ज झाला आहे. थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांसाठी खास २८ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान रत्नागिरी दर्शन बसफेरी सुरु करण्यात येणार आहे. वर्षअखेरीला पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत येतात. त्यांना वाहनांअभावी सर्वच पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. अशावेळी एसटीच्या या रत्नागिरी दर्शन फेरीमुळे पर्यटकांना एका दिवसात रत्नागिरी आणि राजापूरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे.
या बसमधून रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या परिसरातील अनेक पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेट देता येतील. ही गाड़ी दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी बसस्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी आडिवरे, कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे या ठिकाणांना भेटी देणार आहे. सायंकाळी ७ वाजता ही बस पुन्हा आरेवारे मार्गे रत्नागिरी बसस्थानकात पोहोचणार आहे. या गाडीतून प्रवास करण्यासाठी तिकीटदर प्रौढांसाठी ३०० रुपये आणि लहान मुलांसाठी १५० रुपये आकारण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आगारव्यवस्थापक, मोबाईल नंबर 7588193774 आणि स्थानक प्रमुख, मोबा 985089837 या क्रमांकावर संपर्क साधावा. थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी अलिकडे पर्यटकांची पसंती रत्नागिरीला मिळत आहे.