देशाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या थोर देशभक्त विभूतींच्या आठवणी या हर घर तिरंगा अभियानामुळे जनमानसात तीव्रतेने जाग्या होत असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या सार्वभौमत्वेचे प्रतीक असलेला अशोक चक्र असलेला तिरंगा लहानापासून ते मोठ्या सर्वांसाठी प्रिय असून राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेला हा तिरंगा आपल्या घरावर फडकवण्यासाठी जनमानस कमालीचे आतूर असल्याचा अनुभव घरोघरी फिरुन तिरंगा प्रदान करताना आला, असे ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये घरोघरी तिरंगा अभियानाची घराघरात जाऊन तिरंगा सन्मानपूर्वक प्रदान करून करण्यात आली. नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत सन्मानाने तिरंगा स्वीकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरात तिरंगा फडकवण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद दिले, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
राजीव कीर यांनी प्रभाग क्रमांक ७ मध्ये घराघरात जाऊन ध्वज प्रदान करण्याचा उपक्रम आयोजित केला. त्याप्रसंगी श्री. कीर, विक्रांत जैन, मोहन पटवर्धन, शेखर लेले, राजन फाळके, दादा ढेकणे, अतुल लेले, श्री. वैशंपायन, उदय गोडबोले आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याबाबत नागरिक प्रचंड उत्सुक दिसून येत आहेत.
संपूर्ण शहरातील प्रत्येक घरावर, प्रत्येक आस्थापनेमध्ये १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवलेला असेल, हे दृश्य राष्ट्रभक्तीचे विहंगम दृश्य असेल अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी दिली. शासनाने तिरंगा ध्वजासंदर्भातील ध्वजसंहिता शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्टला सूर्योदयानंतर तिरंगा आपल्या घरावर, कार्यालयावर फडकवण्याची व १५ ऑगस्ट सूर्यास्तापर्यंत तो न उतरवता तसाच ठेवण्याची मुभा सर्व नागरिकांना देण्यात आली आहे.

