कोकणामध्ये सध्या सगळीकडे गणपतीचे वेध लागलेले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावी येण्यासाठी दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांची शिकस्त सुरु आहे. मागील वर्षीच्या कोरोना संकटामुळे चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे, परंतु, गणपती साठी काहीही करायची तयारी प्रत्येक रत्नागिरी आणि कोकणवासियांची असते.
रत्नागिरीमधील बाजारपेठ सुद्धा गणपतीच्या सणासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक घराघरातील गणपती मूर्तीला आकर्षक, नाविन्यपूर्ण असा मखर, डेकोरेशन केले जाते. तर काही ठिकाणी धार्मिक, पौराणिक, सामाजिक असे देखावे देखील तयार केले जातात. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे गणपतीला गावाला जाता न आल्याने काहीशी नाराजीच लोकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह देखील कमी झाला आहे. आणि केवळ गणेशमूर्ती आणून स्थापन करण्याकडे कल वाढला आहे.
कांचन डिजिटलचे छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांनी कोरोना काळातही आपल्या बांधवांचे देखावे, आकर्षक सजावट करण्याचे कौशल्य कायम रहावे, त्यांना चालना मिळावी, गेलेला उत्साह परत यावा, यासाठी “गणपती सजावट स्पर्धा” भरविण्याचे योजिले असल्याचे सांगितले. रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ कांचन डिजिटलतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, तसेच उद्योजक प्रसन्न आंबूलकर यांच्या बहुमोल समन्वयाने पार पडणार आहे.
सदरची स्पर्धा रत्नागिरी तालुका मर्यादित असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी गणपती सजावटीचा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर आहे. बनविलेला व्हिडिओ ९४२२५७६७३६,९५५२०३६१५०या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी ८९९९३३२७५७ या क्रमांकावर संपर्क साधावा. कांचन डिजिटलचे कांचन मालगुंडकर यांनी रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.