रत्नागिरी : विज्ञानप्रेमी आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत रोमांचक बातमी समोर येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणात’ लवकरच भारताच्या ऐतिहासिक चंद्रमोहिमेवर आधारित एक अत्यंत आकर्षक आणि माहितीपूर्ण थ्रीडी शो सुरू होणार आहे. खगोलशास्त्र आणि अंतराळ संशोधनाबद्दलची उत्सुकता वाढवणारा हा विशेष कार्यक्रम रत्नागिरीकरांसाठी एक नवी मेजवानी ठरणार आहे.
पुण्यातील प्रख्यात ‘वेदार्थ एनिमेशन स्टुडिओ’ने यासंदर्भात पुढाकार घेतला असून, भारताच्या यशस्वी चंद्रमोहिमेवर तयार करण्यात आलेला हा शो तारांगणात सुरू करण्यासाठी त्यांनी नगर परिषदेकडे अधिकृत परवानगी मागितली आहे. हा शो पूर्णपणे ‘स्टिरिओस्कोपिक थ्रिडी’ (Stereoscopic 3D) स्वरूपात असणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असणारा ८ मीटर व्यासाचा भव्य डोम (Dome) तारांगणाच्या थिएटरमध्ये आधीपासूनच उपलब्ध असल्याने तांत्रिक बाजू बऱ्यापैकी सुकर झाली आहे. या २५ मिनिटांच्या थरारक शोमुळे प्रेक्षकांना अंतराळातील रहस्ये अतिशय जवळून अनुभवता येणार आहेत.
सर्वसाधारण सभेत होणार सविस्तर चर्चा तारांगणामध्ये हा शैक्षणिक व मनोरंजनात्मक शो सुरू करण्याच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. या प्रकल्पाशी संबंधित प्रस्तावाला अधिकृत मंजुरी मिळवण्यासाठी आगामी गुरुवारी होणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय विचारार्थ ठेवण्यात आला आहे.
या सभेत शोची तांत्रिक सुसंगतता, आर्थिक तरतूद, नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा संभाव्य प्रतिसाद, उत्पन्नाची शक्यता, कराराच्या अटी व शर्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगर परिषदेच्या हिताचा विचार करून सविस्तर चर्चा केली जाणार आहे. सर्वसाधारण सभेत हरी झेंडा मिळाल्यानंतर रत्नागिरीतील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारताच्या या गौरवशाली चंद्रमोहिमेचा आनंद आपल्याच शहरात घेता येईल.

