विदर्भ आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिर्या – नागपूर’ राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असले तरी, मे २०२६ ची मुदत पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आहे. विशेषतः आंबा ते चोकाक या टप्प्यात अद्याप ३७ टक्के काम शिल्लक असून, भौगोलिक आव्हानांमुळे ठेकेदार कंपनीला आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या टप्प्यातील ६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. सांगली-कोल्हापूर पट्टा अद्याप रखडलेलाच महामार्गाच्या एकूण प्रगतीचा विचार करता, नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला असून या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, सांगली ते कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम अद्याप रखडलेले आहे. चोकाक परिसरातील भूसंपादनाचा मोठा पेच आता सुटला असून, यामुळे रखडलेल्या कामाला आता नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आंबा घाटात ‘सुरक्षा कवच’ आणि युद्धपातळीवर काम दुसरीकडे, रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबा या पहिल्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून येथे केवळ किरकोळ स्वरूपाची कामे शिल्लक आहेत. सध्या आंबा घाटात काम करताना प्रशासनासमोर पावसाळ्यातील दरडींचे मोठे आव्हान आहे. पावसाळ्यात रस्ता खचू नये किंवा दरड कोसळून अपघात होऊ नये, यासाठी घाटात दोन्ही बाजूंना संरक्षणात्मक जाळ्या लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंगर कपात आणि उड्डाणपुलांमुळे विलंब आंबा ते चोकाक या दरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी महामार्ग प्रशासन अनेक तांत्रिक बदल करत आहे. या टप्प्यात येणारे मोठे डोंगर फोडून रस्ता सरळ केला जात असून, तेथे उड्डाणपुलांचे जाळे उभारले जात आहे. तसेच घाटातील आणि मार्गावरील तीव्र वळणे काढण्याचे काम अत्यंत क्लिष्ट असल्याने या प्रक्रियेला अधिक वेळ लागत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

