HomeRatnagiriकोकण विधान परिषद निवडणूक २०२६: बाळ माने निवडणूक आली की तळ्यात-मळ्यात करतो;...

कोकण विधान परिषद निवडणूक २०२६: बाळ माने निवडणूक आली की तळ्यात-मळ्यात करतो; नारायण राणेंची बोचरी टीका!

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नाट्यमय माघारीनंतर कोकणातील राजकीय वातावरण तापले; ठाकरे गटाकडून बाळ मानेंची हकालपट्टी.

“बाळ माने ओरिजनल भाजपचाच, त्याला सिरीयस घेऊ नका!”

बाळ माने यांच्या अचानक माघार घेण्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राणे म्हणाले,

“बाळ माने हा मूळचा भाजपचाच (ओरिजनल) आहे. निवडणूक आली की त्याचं ‘तळ्यात-मळ्यात’ सुरू होतं. बाळ मानेला कोणीही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तो प्रत्येक निवडणुकीत फक्त पुढच्या ५ वर्षांची स्वतःची तडजोड करून मोकळा होतो.”

विनायक राऊतांना टोला: “चोराच्या उलट्या बोंबा”

या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे रिंगणात होते. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने बाळ माने यांना उतरवले होते. मात्र, ऐनवेळी भाजपचे नेते नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माने यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी बाळ माने यांच्यावर ‘गद्दार’ म्हणून टीका केली होती.

या टीकेचा खरपूस समाचार घेताना नारायण राणे म्हणाले, “विनायक राऊत हे स्वतः कधी शब्द पाळणारे आहेत का? विनायक राऊतांचे इतर धंदे आता बंद झाले आहेत का?” तसेच, संजय राऊत यांनी लावलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या आरोपांवर बोलताना राणे उपरोधिकपणे म्हणाले, “कोणी आणि किती पैसे घेतले हे मला माहीत नाही, ते संजय राऊतांनाच माहीत असेल; कारण कोणतीही माघार अशी विनाकारण घेतली जात नाही.”

ठाकरे गटातून हकालपट्टी आणि बाळ मानेंचा राजकीय प्रवास

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाशी दगाफटका केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळ माने यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.

कोण आहेत बाळ माने?

  • भाजपचे माजी आमदार: बाळ माने हे मूळचे भाजपचे खंदे नेते होते. त्यांनी यापूर्वी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.

  • २०२४ मध्ये ठाकरे गटात प्रवेश: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.

  • उदय सामंत यांच्याविरोधात लढत: २०२४ मध्ये त्यांनी रत्नागिरीतून महायुतीचे मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला.

  • २०२६ मधील नाट्यमय वळण: विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाकडून मोठी उमेदवारी मिळूनही त्यांनी ऐनवेळी माघार घेत महायुतीला अप्रत्यक्ष साथ दिली. कोकणच्या राजकारणात हा मोठा धक्का मानला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular