HomeMaharashtraऑपरेशन टायगर यशस्वी! केंद्रात शिवसेनेला मिळणार आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद; उदय सामंतांचे...

ऑपरेशन टायगर यशस्वी! केंद्रात शिवसेनेला मिळणार आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद; उदय सामंतांचे मोठे वक्तव्य

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर उदय सामंत यांचा उबाठा नेतृत्वावर निशाणा; २०२२ मधील 'त्या' अंतर्गत घडामोडींचा केला खुलासा.

मुंबई: दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार बाजूला झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटासाठी हा फार मोठा धक्का मानला जात असून, शिंदे गटाची ताकद यामुळे कमालीची वाढली आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीवर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, “सत्तेत वाटा वाढला की केंद्रात नक्कीच वाढीव मंत्रीपदही मिळणार. जेव्हा आमची ताकद वाढेल, तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याबाबत निश्चितच मागणी केली जाईल.”

खासदार फुटण्यामागे ‘ते’ स्वतःच शिल्पकार! ‘ऑपरेशन टायगर’चे श्रेय कोणा एका नेत्याला किंवा रणनीतीला देण्याऐवजी उदय सामंत यांनी थेट ठाकरे गटाच्या नेतृत्वावर निशाणा साधला. ते म्हणाले, “या ऑपरेशनचे शिल्पकार इतर कोणी नसून ते ६ खासदार स्वतःच आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार पूर्वनियोजित बैठकांना पोहोचले नाहीत, यावरूनच हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. पक्षाचे नेतृत्व जेव्हा आपल्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभे राहत नाही, तेव्हा पक्षात फूट पडणे अपरिहार्य असते. या खासदारांचा त्यांच्या आधीच्या नेतृत्वावरील विश्वास उरलेला नाही.”

२०२२ मधील बंडाच्या आठवणींना दिला उजाळा उदय सामंत यांनी २०२२ मधील एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक उठावाच्या आठवणींना उजाळा दिला. “जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडण्यासाठी पाऊल उचलले, तेव्हा मी स्वतः पक्षप्रमुखांना (उद्धव ठाकरे) विनंती करत होतो की, आपण शिंदे साहेबांना परत आणूया आणि आपल्या ‘नॅचरल अलायन्स’ (भाजपसोबतच्या नैसर्गिक युती) कडे जाऊया. मिलिंद नार्वेकर जेव्हा शिंदेंना भेटायला आले, तेव्हाही सकारात्मक मार्ग काढण्याची तयारी होती. मात्र, पक्षप्रमुखांना काही लोकांनी चुकीचे ब्रिफिंग दिले आणि त्यांनी काँग्रेसची साथ सोडण्यास नकार दिला,” असा खुलासा सामंत यांनी केला.

‘कोथळा आणि तुडवा’ या भाषेचा काहीही फायदा नाही ठाकरे गटाकडून होणाऱ्या तिखट टीकेचा आणि ‘कोथळा काढू’, ‘तुडवू’ अशा भाषेचा समाचार घेताना सामंत म्हणाले की, “अशी भाषा कार्यकर्त्यांमधील तात्पुरता उत्साह वाढवण्यासाठी ठीक असते, पण प्रत्यक्षात याचा राजकारणात काहीही फायदा होत नाही. २०१९ मध्ये जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले होते, मग तेव्हा काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करणे हा जनमताचा अपमान नव्हता का? मग आता ६ खासदार बाहेर पडल्यावर त्याला जनमताचा अपमान कसे म्हणता येईल?”

श्रीकांत शिंदे केंद्रीय कॅबिनेटमध्ये दिसणार? संसदेत खासदारांचे संख्याबळ वाढल्यास खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार का? या प्रश्नावर सामंत यांनी स्पष्ट केले, “मागेही जेव्हा संधी आली होती, तेव्हा स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली होती. त्यांनी ‘एक सच्चा शिवसैनिक आधी मंत्री झाला पाहिजे’ अशी भूमिका घेत प्रतापराव जाधवांचे नाव सुचवले होते. मात्र, आता संख्याबळ वाढल्यामुळे केंद्रात शिवसेनेचा वाटा आणि मागणी नक्कीच वाढणार आहे.”

पक्षप्रवेशाची मालिका सुरूच राहणार! उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे की ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. “येत्या काही दिवसांत काँग्रेस आणि उबाठा (UBT) गटाचे अनेक नगरसेवक आणि स्थानिक नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. २०२९ ची विधानसभा निवडणूकही आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही अत्यंत परिपक्व नेते असल्याने त्यांच्यात कोणताही ‘मोठा भाऊ-छोटा भाऊ’ असा वाद रंगणार नाही,” असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular