शिवसेना (ठाकरे गट) खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजकारणातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी थेट दावा केला आहे की, “जर संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांनी पक्षाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर त्या थेट अपात्र ठरतील.”
जागावाटपावरून मनसेचा जुना राग समोर
हा संपूर्ण वाद मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळच्या जागावाटपाशी जोडला गेला आहे. भांडुपमधील ज्या जागेवरून राजुल पाटील निवडून आल्या होत्या, ती जागा मूळची मनसेची हक्काची जागा होती, असा दावा किल्लेदारांनी केला. मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी तिथे अपक्ष लढूनही चांगली मतं घेतली होती. जर त्यांना मनसेकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असती, तर त्या नक्कीच निवडून आल्या असत्या, असा विश्वास मनसेने व्यक्त केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या विषयावर खळबळजनक खुलासा केला. ते म्हणाले, “मी महापालिका निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सावध केलं होतं की, संजय दिना पाटील हे पक्षासोबत राहणार नाहीत, ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीला भांडुपमधून तिकीट देऊ नका. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही.”
‘ऑपरेशन टायगर’चे दावे पोकळ?
शिवसेना खासदारांच्या बंडानंतर महापालिकेतही ‘ऑपरेशन टायगर २ आणि ३’ करून ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याच्या चर्चा आहेत. यावर यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “खासदारांच्या फुटीमुळे काहींचा आत्मविश्वास वाढला असला, तरी महापालिकेत तोडफोडीचे राजकारण यशस्वी होणार नाही. दर महिन्याला मनसे नगरसेवकांची आढावा बैठक होत असते. महापालिकेत मनसेचा ठसा उमटवण्यावर आमचा भर आहे. विरोधकांना अल्प निधी दिला जात असताना, अशा खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात महापालिकेत तसं कोणतंही वातावरण नाही.”
संजय दिना पाटील यांनी आपल्या मुलीच्या जागेसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता, पण आता जर राजुल पाटील यांनी एकट्याने पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला, तर कायद्यानुसार त्या अपात्र ठरतील, असा इशारा किल्लेदारांनी दिला आहे.

