रत्नागिरी: कोकणची खरी ओळख आणि जगभरातील खवय्यांची पहिली पसंती असणाऱ्या जगप्रसिद्ध ‘रत्नागिरी हापूस’वर पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचे सावट पसरले आहे. सामान्यतः गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानंतर (नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास) येणारा आंब्याचा मोहोर, यंदा थेट भरपावसात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच झाडांवर फुलल्याचे चित्र समोर आले आहे. रत्नागिरी परिसरातील गणपतीपुळे आणि पावस यांसारख्या कातळ भागातील बागांमध्ये हापूसच्या कलमांवर मोठ्या प्रमाणावर अवकाळी मोहोर दिसून येत असल्याने शेतकरी आणि आंबा बागायतदार कमालीचे धास्तावले आहेत.
अवेळी मोहोर येण्यामागचे नेमके कारण काय?
यंदाच्या पावसाळ्यात वातावरणातील चढ-उतार सातत्याने जाणवत आहेत. जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली होती, तर ऑगस्ट महिन्यातही अनेक दिवस पावसाने विश्रांती घेत कडक ऊन पाहायला मिळाले.
-
पालवीचे लवकर परिपक्व होणे: मे महिन्यात झाडांवर आलेली नवी पालवी जूनमधील कोरड्या हवामानामुळे लवकर परिपक्व (मॅच्युअर) झाली.
-
ऊन-पावसाचा खेळ: ऑगस्टच्या अखेरीस दोन-तीन दिवस पावसाची उघडीप आणि त्यानंतर पडलेले कडक ऊन यामुळे झाडांमध्ये जैविक बदल घडून आले आणि या परिपक्व पालवीतून चक्क मोहोर बाहेर पडला. कातळ परिसरातील जुन्या आणि नव्या अशा दोन्ही प्रकारच्या झाडांवर हे चित्र जास्त ठळकपणे दिसत आहे.
फवारणी करणे ठरतेय आर्थिकदृष्ट्या तोट्याचे
ऑगस्ट-सप्टेंबरच्या दमट व पावसाळी वातावरणात या मोहरावर फळधारणा (आंबे धरणे) होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. सतत पडणारा पाऊस, हवेतील अति दमटपणा यामुळे मोहरावर बुरशी व किडीचा प्रादुर्भाव वेगाने होतो.
हा मोहोर टिकवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते; मात्र सततच्या पावसात औषधे वाहून जाण्याचा धोका असल्याने हा खर्च बागायतदारांच्या आवाक्याबाहेरचा ठरतो. केवळ ‘हंगामातील पहिला आंबा’ बाजारात आणण्याच्या नादात लाखो रुपयांचा चुराडा करणे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे असल्याने बहुतांश शेतकरी या मोहराकडे दुर्लक्ष करणेच पसंत करत आहेत. काही ठिकाणी शेतकरी ताडपत्री बांधून मोहोर वाचवण्याचा मर्यादित प्रयत्न करत आहेत.
मुख्य हंगाम लांबणार? उत्पादनात घट होण्याची भीती
सध्या आलेला हा अवकाळी मोहोर गळून पडल्यास, नियमित हंगामाच्या वेळी (डिसेंबर-जानेवारी) झाडांना पुन्हा नव्याने मोहोर येईल का? याबाबत तज्ज्ञ आणि बागायतदारांमध्ये साशंकता आहे. निसर्गाच्या या चक्रव्युहामुळे २०२७ चा अधिकृत हापूस हंगाम उशिरा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी एकूण उत्पादनात मोठी घट होऊन कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
“पावसाळ्यात हापूस कलमांना मोहोर येणे हा थेट हवामान बदलाचा (Climate Change) परिणाम आहे. ऊन आणि पावसाच्या अनपेक्षित खेळामुळे हा मोहोर आला असला, तरी याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार नाही. उलटपक्षी, या मोहरानंतर झाडांना परत नवी पालवी फुटली, तर मुख्य हंगामात मोहोर येण्यास विलंब होईल आणि हंगाम पुढे ढकलला जाईल.”
— उमेश रहाटे, आंबा बागायतदार (वाटद-खंडाळा, रत्नागिरी)

