दोन आठवड्यांपूर्वी खेर्डी बाजारपेठेत अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली; मात्र त्यात बड्यांना अभय दिल्यानंतर त्यांची बांधकामे जागेवरच उभी आहेत. त्यामुळे कारवाई झालेले अन्य व्यावसायिकही हळूहळू रस्त्यावर येऊ लागले आहेत. उद्ध्वस्त केलेल्या बांधकामांचीही रात्रीच्यावेळी पुनर्बाधणी केली जात असल्याने मोठा गाजावाजा करत राबवलेली अतिक्रमणविरोधी मोहीम फसली आहे. काही दिवसांपूर्वीच कराड रस्त्यावर खेर्डीत झालेल्या अपघातानंतर अतिक्रमण आणि रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत व्यावसायिकांविरोधात सर्वत्र पडसाद उमटले होते. या रस्त्यांवर होणाऱ्या वाढत्या अपघातांना अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने ५० हून अधिक जणांना अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली होती; मात्र तरीही अतिक्रमणे काढली न गेल्याने अखेर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. यामध्ये असंख्य व्यापाऱ्यांनी या मोहिमेला स्वतःहून सहकार्य करत आपली अतिक्रमणे हटवली; मात्र बड्या व्यापाऱ्यांनी बांधकामे काढून टाकतो, असे सांगून वेळ मारून नेली.
दहा दिवसांत रस्त्याला लागून असलेल्या शेड, अनधिकृत बांधकामे बड्या व्यावसायिकांनी काढलेली नाहीत. कारवाईत बड्यांना अभय दिल्याने आता संतप्त झालेल्या अन्य व्यावसायिकांनी हळूहळू आपली बांधकामे रस्त्यालगत आणण्यास सुरवात केली आहे. कारवाईनंतर रस्त्यावर बसणारे गायब झाले होते; मात्र हातगाड्या, टपऱ्या पुन्हा रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे नाल्यावरील बांधकामे या कारवाईत जेसीबी लावून उद्ध्वस्त करण्यात आली होते. आता अशा बांधकामांचीही रात्रीच्यावेळी पुनर्बाधणी होत आहे. गेल्या आठवड्यात युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांच्या माध्यमातून नागरिक, व्यापाऱ्यांची महामार्ग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत बड्या व्यापाऱ्यांना दिलेल्या अभयवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते.