31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriरत्नागिरीत फटाके फुटले, दोघांनाही विजयाची खात्री, पैजा लागल्या!

रत्नागिरीत फटाके फुटले, दोघांनाही विजयाची खात्री, पैजा लागल्या!

कोण विजयी होणार त्याचा फैसला ४ जूनला होईल!

मतदान संपल्यानंतर तत्काळ रत्नागिरीत फटाके फुटले ! शिवसेनेच्या आठवडा बाजार येथील कार्यालयाजवळ प्रथम ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. पाठोपाठ जवळच असलेल्या प्रमोद महाजन मैदानाजवळ भाजपा कार्यालयासमोरही फटाक्यांची आतषबाजी झाली. ना. नारायण राणे, खा. विनायक राऊत व अपक्ष उमेदवार श्री. शकील सावंत या तिघांच्या वतीने ‘आपणच जिंकणार’ अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या… परंतु अखेर मतदारांनी काय करुन ठेवले असेल त्यावर सर्व ठरेल ! कोण विजयी होणार त्याचा फैसला ४ जूनला होईल! मात्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कोण किती मतांनी विजयी होणार याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली असून काही मंडळींनी पैजा देखील लावल्या आहेत.

९ उमेदवार रिंगणात – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. एकूण ९ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुतीचे उमेदवार व विद्यमान केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खा. विनायक राऊत व अपक्ष उमेदवार श्री. शकील सावंत यांच्यातच असल्याचे चर्चिले जाते.

विलक्षण चुरशीचा सामना – संपूर्ण मतदार संघात ना. नारायण राणे व खा. विनायक राऊत या दोघात विलक्षण चुरशीचा सामना होत असल्याचे दृष्य होते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बूथवर आपल्या समर्थकांचे जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी शिकस्त करत होते. रणरणत्या उन्हातही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परीश्रम घेताना दिसत होते.

रत्नागिरीत फटाके फुटले ! – सायं. ६ वा. मतदान संपले व काही क्षणातच रत्नागिरीत फटाके फुटले. रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय आहे. तेथे शिवसैनिक एकत्र आले व त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. पाठोपाठ हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रमोद महाजन मैदाना शेजारी भाजप कार्यालयासमोरही फटाक्यांची आतषबाजी झाली.

सर्वांना विजयाची खात्री – दोन्ही बाजूंनी फटाके फोडून विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे सारे वातावरण दणाणून गेले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून कोण जिंकेल? याची उत्सुकता मतदारांना लागून राहिली आहे. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी आपला उमेदवार निवडून येईल अशी खात्री पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

३ लाखांचे मताधिक्य ! – यावेळी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या सम र्थकांनी दादा ३ लाखांच्या म ताधिक्क्याने विजयी होतील असा दमदार आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच खा. विनायक राऊत यांच्या समर्थकांनी देखील विनायक राऊत ३ लाखांच्या दणदणीत मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

मतदारांवर अवलंबून! – अपक्ष उमेदवार श्री. शकील सावंत यांना अॅड. ओवेस पेचकर यांच्या कोकण प्रादेशिक पक्षाने समर्थन दिलेले आहे. त्यांच्याही समर्थकांनी सांगितले की, आमचे उमेदवार दणदणीत मताधिक्क्याने विजयी होतील. तीनही उमेदवारांचे समर्थक विजयाचा विश्वास व्यक्त करीत असले तरी मतदारांनी नेमके काय करुन ठेवले आहे ते सांगता येत नाही.

अनेकांनी पैजा लावल्या! – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील लढतीकडे ‘साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोण जिंकणार यावर पैजा देखील लागल्या आहेत. राणे निवडून येतील अशी खात्री भाजपा व महायुतीच्या मंडळींना वाटत आहे तर खा. विनायक राऊत विजयाची हॅटट्रीक करतील असा विश्वास शिवसैनिकांना व महाआघाडीच्या नेत्यांना वाटत आहे.

सर्वांनाच उत्सुकता – मतमोजणी ४ जूनला होईल, तोपर्यंत कोण जिंकेल याची चर्चा गावोगाव सुरु राहील. पुढील २०- २५ दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कोण जिंकणार त्याची चर्चा व गजाली रंगतील. ४ जूनला निकाल काय लागतो याची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular