30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेकडून आर्थिक फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट...
HomeChiplunनिलेश राणेंवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट भाजपने तोफ डागली, आ. जाधवांवर गंभीर आरोप

निलेश राणेंवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट भाजपने तोफ डागली, आ. जाधवांवर गंभीर आरोप

अत्यंत गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शुक्रवारी चिपळुणात घडलेली घटना फक्त राजकीय राडा इथपर्यंत मर्यादित नसून भाजप नेते निलेश राणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला होता. तो एक व्यापक कटाचा भाग होता, असा अत्यंत गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. आम. जाधव यांच्यासह या कटात सहभागी असलेल्यांवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. चिपळूणमध्ये शुक्रवारी झालेल्या राड्यानंतर भाजपने अधिकृतपणे आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष केदार साठे यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आ.भास्कर जाधवांवर अनेक गंभीर आरोप केले.

ठरवणारे ते कोण.? – केंदार साठे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आमच्या नेत्याने कुठून जावे, कुठे स्वागत स्वीकारावे हे ठरवणारे भास्कर जाधव कोण? आम्ही सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन ते नियोजन केले होते. पोलिसांनीचं तसा रूट दिला होता. पण आमदार भास्कर जाधवांनी त्याठिकाणी गर्दी जमवण्याचे कारण काय होते? तसेच कार्यकर्त्यांना चिथवण्याचे काम ते स्वतः करत होते हे काही व्हिडीओ क्लिप मधून दिसून येत आहे. जर त्यांनी हा सर्व प्रकार केला नसता तर पुढील घटना घडलीच नसती असेही केदार साठे म्हणाले.

दगड, सळ्या कुठून आले कार्यालय – आम. जाधवांच्या परिसरात दगड आणि सळ्या देखील दिसून येत आहेत. ते कुठून आले? कशासाठी त्यांनी हा साठा केला होता? परत कार्यकर्त्यांना बोलावून जमाव करण्याची गरजच काय होती? असे अनेक प्रश्न उपस्थित करतं ते म्हणाले हा एक व्यापक कटाचा भाग होता. निलेश राणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यामुळे हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. तसेच या कटात कोणकोण सामील आहेत त्याचा देखील शोध पोलिसांनी घ्यावा अशीही मागणी त्यांनी केली.

गुहागरात ते अडचणीत – मुळात आ. भास्कर जाधव गुहागर मतदारसंघात पूर्णतः अडचणीत आले आहेत. यावेळी त्यांचा पराभव नक्की आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते अशा गोष्टी करत आहेत. आणि आ. भास्कर जाधवांची ही जुनी सवय आहे. त्यांच्या अंगाशी आले की ते असे काहीतरी करत असतात आणि यावेळी त्यांनी जे केले ते ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना पसंत पडलेले नाही. सिंधुदुर्गात जाऊन राणे कुटुंबावर बोलण्यापेक्षा कोकणाच्या विकासावर त्यांनी बोलायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले.

सुरुवात त्यांनीच केली – निलेश राणे यांनी भाषणात वापरलेली शिवराळ भाषा भाजपची संस्कृती आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता केदार साठे म्हणाले आम. भास्कर जाधवांनी सिंधुदुर्गात जी भाषा वापरली ती भाषा योग्य होती का? म्हणजे त्यांनी काहीही बोलावे आणि आम्ही ते सहन करावे असे होत नाही. क्रियेला प्रतिक्रिया ही येणारच असे उत्तर देत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. मुळात सुरुवात भास्कर जाधव यांनीच केली होती. त्याला उत्तर म्हणून गुहागरची सभा होती, असे त्यांनी सांगितले.

होय! हे थांबायला हवे – ‘हा वाद थांबणे आवश्यक आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होय नक्कीच हे थांबले पाहिजे. पण आम. भास्कर जाधवांची ही सवय आहे. विषय थांबला म्हणून सांगायचे आणि नवीन काहीतरी उकरून काढून वाद निर्माण करायचा, वाद थांबवायचा असेल तर आपल्या भाषेला आवर घालावा लागेल. आम. जाधवांनी जर आपल्या भाषेला आवर घातला तर हा वाद नक्की थांबेल असेही केदार साठे यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेला चिपळूणचे माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, भाजप तालुकाध्यक्ष ताम्हणकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular