21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriप्रकल्प होण्यासाठी आधी जागेचा मोबदला जाहीर करा - प्रमोद जठार

प्रकल्प होण्यासाठी आधी जागेचा मोबदला जाहीर करा – प्रमोद जठार

भाजपच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर जठार पत्रकारांशी बोलत होते.

तळकोकणामध्ये बेरोजगारी वाढली असून, कोकणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता आहे. प्रकल्प होण्यासाठी जागेची आवश्यकता असून त्यासाठी शासनाने जागेचा योग्य तो भाव वा मोबदला तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपचे लोकसभा प्रभारी आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शेतकरी आणि जागामालक जागा देण्यास तयार असून रिफायनरीमुळे भविष्यामध्ये कोकण निश्चितच आर्थिक राजधानी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर जठार पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने युवावर्ग रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरित होणे, ही चिंताजनक बाब आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होणे गरजेचे आहे. प्रकल्प उभारणीसाठी जागेची आवश्यकता आहे. जागेचा योग्य तो मोबदला शासनाने जाहीर केल्यास त्या माध्यमातून प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न निश्चितच सुटेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. त्यांनी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही या वेळी केले. त्यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, माजी तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, विद्यमान तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, अनिल करंगुटकर, स्वप्नील गोठणकर, अरविंद लांजेकर, सुयोगा जठार यांसह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

अहवाल काही असो – रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या बारसू येथील जागेच्या केलेल्या माती परीक्षणाचा अद्यापही अहवाल जाहीर झालेला नाही. याबाबत पत्रकारांनी जठार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी माती परीक्षणाच्या अहवालापेक्षा लोकांना जमिनीचा मोबदला शासनाने जाहीर करणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. त्यामुळे आपण शासनाकडून जागेचा मोबदला जाहीर होण्यासाठी आग्रही असल्याचेही या वेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular