समुद्रात खूप खोलवर जाऊन तिथले काही नमुने गोळा करून त्यांचा उपयोग संशोधन कार्यासाठी केला जातो. ज्याप्रमाणे चांद्रयान मोहीम काढली त्याप्रमाणे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनेही यापूर्वी समुद्राच्या तळाशी जाऊन मोहीम राबवली आहे; परंतु तेथे खूप मोठे आव्हान आहे. अशा धाडसी मोहिमा राबवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. समीर डामरे यांनी केले. नियंत्रित मार्गाने व जलचर, सेल संस्कृती, रासायनिक संश्लेषण आणि अनुवांशिक अभियांत्रिकी यांच्या माध्यमातून मरिन बायोटेक्नॉलॉजीचा वापर करणे शक्य आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. डामरे यांनी दिली. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित सागर महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मरिन बायोटेक्नॉलॉजीवर बोलत होते.
डॉ. डामरे यांनी समुद्रात मिळणाऱ्या विविध गोष्टींविषयी माहिती दिली तसेच बायोटेक्नॉलॉजी संदर्भातील इतिहास, समुद्रात होणारे संशोधन, त्यातील आव्हाने यावर इत्थंभूत माहिती दिली. आज दिवसभरात सागर महोत्सवात भाट्ये किनाऱ्यावर अभ्याससहलीत प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांनी मार्गदर्शन केले. कोरल्सवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या डॉ. मंदार नाणजकर यांनी व्याख्यान दिले. खारफुटीची गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर यांनी व्याख्यान दिले. या वेळी गोदरेज मँप्रूव्हजने बनवलेले खारफुटीवरील व्हिडिओ व खाडीतील जैवविविधतेवरील लघुपट दाखवण्यात आले.