या भगवान कोकरे नावाच्या इसमाने श्री क्षेत्र परशुराम शेजारी लोटे गावात आपले ‘अध्यात्मिक गुरुकूल’ अशा गोंडस नावाने आश्रम सुरु केला.
आज दुसऱ्या मुलीची तक्रार – या ‘भगवानदास’ कोकरे नावाच्या तथाकथित महाराजाच्या विरुध्द मंगळ. दि. १५ ऑक्टो. रोजी एका पीडीत अल्पवयीन मुलीने विलक्षण धैर्य दाखवून पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आणि साऱ्या कोकणात खळबळ उडाली. त्यानंतर केवळ २ दिवसातच त्याच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या एका अल्पवयीन पीडीत मुलीने आज तशाच प्रकारे पोलिस स्थानकात जाऊन कणखरपणे आपली तक्रार दाखल केली. या २ अल्पवयीन मुलींनी जे धैर्य दाखवले त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
परशुराम भूमी बचावली – या दोघा मुलींनी धैर्य दाखवले म्हणूनच या ‘भगवानदास’ कोकरेने मांडलेला वासनेचा बाजार समाजा समोर आला. आजवर सारे काही खुल्लमखुल्ला सुरु होते परंतु कुणी त्याच्याविरुध्द ‘ब्र’ उच्चारण्यास तयार नव्हते. शेवटी या २ अल्पवयीन मुलींनी विलक्षण धैर्य दाखवले म्हणूनच या ‘भगवानदास’ कोकरेचा वासनेचा बाजार उठला व ही परशुराम भूमी अशा कुकर्मांनी नासवली जाण्यापासून बचावली असे आता कोकणात गावोगाव सर्वत्र चर्चिले जात आहे.
नको नको ते अत्याचार ! – या ‘भगवानदास’ कोकरेच्या तथाकथित आश्रमात ही दुसरी मुलगी देखील शिकायला होती. तक्रार करणाऱ्या पहिल्या मुलीप्रमाणेच या अल्पवयीन मुलीवर देखील या बुवाने नको नको ते अत्याचार केले, लैंगिक शोषण केले. पहिल्या अल्पवयीन मुलीप्रमाणेच ही दुसरी अल्पवयीन मुलगी देखील मागील कैक महिने हा त्रास नाईलाजाने सोसत आली.. शेवटी सहनशक्तीचा कडेलोट झाला तेव्हा तिने पोलिस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला.
कोकरे ‘डबल पोस्को ‘धारी! – पोलिसांनी या दुसऱ्या अल्पवयीन मुलीची तक्रार तत्परतेने नोंद केली आणि भगवान कोकरेवर ‘पोस्को’ खाली दुसरा गुन्हा दाखल झाला. तसेच त्याचा साथीदार प्रितेश कदम याच्यावर देखील आज ‘पोस्को’ खाली दुसरा गुन्हा दाखल झाला. या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार पीडीत अल्पवयीन मुलीची आत्या रोहिणी संतोष वामन हिच्यावर देखील खेड पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचार – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लैंगिक अत्याचार व लैंगिक शोषणाच्या घटना दि. १६ ऑक्टो. २०२४ते १८ जून २०२५ या कालावधीत भगवान कोकरेच्या लोटे येथील कथित आश्रमात घडल्या. हा भगवान कोकरे त्याच्या तथाकथित गुरुकुलामध्ये धार्मिक शिक्षण व साधनेच्या नावाखाली तेथे शिक्षणासाठी आलेल्या मुलींवर लैंगिक अत्याचार व लैंगिक शोषण करायचा असे त्या मुलींच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
समजावण्यासाठी आत्या – कोकरेच्या आश्रमातील पहिल्या मुलीने दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करताच कोकरेने विलक्षण चाणाक्षपणा दाखविला. अन्य कोण कोण मुली तक्रार करु शकतील याचा अंदाज घेऊन त्यांना गप्प करण्यासाठी चौफेर फिल्डींग लावली. त्यांना समजावण्यासाठी त्यांच्या घरी कुणा कुणाला पाठविले. तशाच प्रकारे आज तक्रार दाखल करणाऱ्या पीडीत अल्पवयीन मुलीच्या घरी तिची आत्या रोहिणी संतोष वामन हिला पाठविले असे त्या मुलीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
आत्यावरही गुन्हा दाखल – आत्या रोहिणीने मुलीच्या घरी जावून समजावण्याचा जोरदार प्रयत्न केला. ‘कोकरे बुवाचा मोठा वशिला आहे.. त्याचे हात वरपर्यंत पोचले आहेत.. अनेक पुढारी त्याच्या खिशात आहेत.. आपली तो वाट लावेल..’ असे सांगून प्रकरण मिटवण्याचा तिने प्रयत्न केला. त्यामुळे आज दुसऱ्या मुलीने हे सर्व तक्रारीत नमूद करताच पोलिसांनी तिची आत्या रोहिणी संतोष वामन हिच्यावर देखील दोघा नामचीन आरोपींसह गुन्हा दाखल केला. तिने गुन्हा दडपण्यासाठी आरोपींना सहकार्य केल्याने तिच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.
कोकरेला कोठडी – या प्रकरणी खेड पोलिसांनी या तिघांविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (१), ६५, ३५१(३), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारां पासून संरक्षण अधिनियम (पोस्को) २०१२ चे कलम ४ व ८ अन्वये रितसर गुन्हा दाखल केला आहे. भगवान कोकरे व त्याचा साथीदार प्रितेश कदम यांना न्यायालया पुढे प्रथम उभे करण्यात आले तेव्हा २ दिवसांची पोलिस कोठडी फर्मावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा न्यायालया समोर उभे करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने ३० ऑक्टो. पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

