मुंबई-गोवा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या पाच राज्यांतून जातो. एकूण २ हजार १५० किमी लांबीच्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र वगळता चारही राज्यांमध्ये जलद गतीने पूर्ण केले आहे. कोकणातून जाणारा हा सागरी महामार्ग पूर्णत्वास जाण्यासाठी, किनारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तरी आता हिवाळी अधिवेशनात यावर आवाज उठवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या दापोली तालुका पर्यटन उद्योग चांगला सुरु असून, पूर्वी गोव्याला जाणारे पर्यटक दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगाने कात टाकली असून पूर्वी मर्यादित गावांमध्येच होणारी न्याहारी निवास आणि रिसॉर्टची व्यवस्था आता अनेक किनाऱ्यांवर विस्तारली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे काही वर्षातच येथे स्थानिक आणि परजिल्ह्यातील भांडवलदारांनीही मोठमोठे रिसॉर्ट बांधले आहेत.
सध्या ताजे मासे आणि स्वच्छ किनारपट्टी हेच येथील पर्यटनाचे प्रमुख आधार राहिले आहेत; मात्र याच जोडीला येथील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि अंतर्गत भागातील कृषी पर्यटनस्थळेही पर्यटकांना आकर्षित करू लागल्याने स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्गही रखडल्याने कोकणचा मुख्य आधार बनू पाहत असलेला पर्यटन उद्योग अपेक्षित उंचीवर पोहचू शकलेला नाही. दापोली मंडणगडमधील बाणकोट, केळशी खाडी पूल पूर्णत्वाच्या, तर दाभोळ खाडीवरील पूल मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने दापोलीतील पर्यटन उद्योगाने अद्याप टॉप गिअर टाकलेला नाही. हा महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता येथील पर्यटन उद्योगाचे चित्र अधिक सुखावह दिसले असते.
सागरी महामार्गामुळे येथील पर्यटन उद्योग अधिकच बहरण्याची आशा बाळगून असलेल्या येथील जनतेची बाणकोट, केळशी आणि दाभोळ खाड्यांवरील रखडलेल्या पुलांमुळे निराशा झाली आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवून सागरी महामार्गाचे महाराष्ट्रातील रखडलेले पूल आणि रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.