शहरातील आठवडा बाजार येथे भंगार डेपोला अचानक आग लागली. त्यामुळे पत्र्याच्या कंपाऊंडमधून आगीचे लोळ बाहेर पडू लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि यंत्रणेची धावपळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ याची माहिती पालिकेच्या व एमआयडीसी अग्निशमन दलाला दिली. दोन्ही बंब घटनास्थळी वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आली. आग लागल्यानंतर नागरिकांनी ही गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. शहरातील आठवडा बाजार येथे मोठा भंगार डेपो आहे. या डेपोला पत्र्याचे कंपाऊंड आहे.
नेमका हा डेपो कोणाचा आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास या भंगार डेपोला अचानक आग लागली. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ पत्र्याच्या कंपाऊंड बाहेर पडू लागले. तसा एकच गोंधळ उडाला. आग… आग…, अशी आरडाओरड सुरू झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. स्थानिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन दलाला फोन केला. पालिकेचे बंब तत्काळ दाखल झाला. परंतु आगीने बराचसा परिसर घेरला होता.
अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धुराचे लोळ उसळत होते. दुर्गंधी पसरली होती. काही लोकांसाठी हे निवाऱ्याचेही ठिकाण आहे. या आगीचे स्वरूप वाढल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. तरीही त्यांचा आरडा-ओरडा सुरू होता. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. स्थानिक लोकप्रतिनिधी संजय साळवी, बिपिन बंदरकर यांच्यासह अनेक जण घटनास्थळी दाखल झाले. पालिकेने आगीवर पाणी मारल्यानंत्र धुरांचे लोट सुरू झाले. त्यानंतर एमआयडीसीचा बंब आल्यावर ही आग आटोक्यात आणली. परंतु आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.