भाजप नेते आमदार नीलेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांना हिशेब चुकता करण्यास येतोय, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राणे-जाधव जुना वाद पुन्हा वर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणात भास्कर जाधव आणि नारायण राणे हा वाद काही वर्षांपूर्वी पेटला होता. कोकणात अलीकडे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता पुन्हा एकदा राणे व ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी कोकण दौऱ्यात नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.
त्या ठिकाणी लगेचच नीलेश राणेंनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेऊन जाधवांना सज्जड इशारा दिला होता. त्याचवेळी १६ फेब्रुवारीला, मी गुहागर येथे येत असून, त्या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेत जाधवांबद्दल सगळेच बोलणार, असाही इशारा राणेंनी दिला होता. त्या सभेची गुहागर येथे तयारी आता सुरू झाली आहे. ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे व माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांना लक्ष्य केले होते. त्याचा समाचार नीलेश राणे यांनी घेतला होता. या राजकीय शह-काटशहात नीलेश राणे यांची १६ फेब्रुवारीला गुहागर येथे जाहीर सभा होणार आहे. त्या सभेचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे.
गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या मतदार संघात होमपीचवर राणे यांच्या सभेचे महत्त्व वाढले आहे. ‘मी येतोय… हिशेब चुकता करायला….१६ फेब्रुवारी २०२४… पाटपन्हाळे माध्यमिक विद्यालय शृंगारतळी गुहागर संध्याकाळी पाच वाजता… मी येतोय नीलेश नारायणराव राणे…’ अशा स्वरूपाचा टीझर सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे या जाहीर सभेत राणे काय बोलणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भास्कर जाधवांना सडेतोड उत्तर दिले होते.
जाधवांचा एकेरी उल्लेख करत, ‘बाळासाहेबांना सांगून मी त्याला त्या वेळेला तिकीट द्यायला लावले. चिपळूण येथील तत्कालीन आमदार खेडेकरांना बाजूला करून याला तिकीट दिले. याच्याकडे पैसेही नव्हते. त्या वेळी निवडणूक लढण्यासाठी १५ लाख रुपये दिले. ते अद्यापही परत देण्याचे नाव नाही. आता हाच कृतघ्न माणूस माझ्यावर टीका करतो,’ अशा शब्दांत नारायण राणेंनी जाधवांना सुनावले होते. इतकेच नाही तर ‘माझ्यावर टीका करणाऱ्यांना अद्दल घडवणार, चोप देणार’, असा सज्जड दमही भरला. या वार-पलटवाराच्या पार्श्वभूमीवर कोकणात पुन्हा एकदा जाधव विरुद्ध राणे यांच्यातील संघर्ष वर येणार का, याची उत्सुकता लागली आहे.