रत्नागिरी: ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी काहीशी चिंताजनक परिस्थिती सध्या रत्नागिरीकरांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहराचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. पानवल धरणाची दुरुस्ती झाली, गाळ काढण्यात आला. येत्या पावसाळ्यात हे धरण तुडुंब भरणार हेही नक्की आहे; पण दुर्दैव असं की, धरण भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची चिन्हं आहेत. पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि थकीत बिलांमुळे हा संपूर्ण प्रकल्प सध्या अधांतरी अडकला आहे.
१६ कोटींचा भव्य प्रकल्प, पण पाणी आणणार कसं?
रत्नागिरी शहराला नैसर्गिक उताराने पाणी पुरवण्याची क्षमता या पानवल धरणात आहे. पावसाळ्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे धरण शहराची तहान भागवू शकतं. हाच विचार करून नगरपालिकेने तब्बल १६ कोटी रुपये खर्च करून धरणाचे नूतनीकरण केले. धरणाची गळती थांबवण्यासाठी मजबूत संरक्षक भिंत बांधण्यात आली, सांडव्याचे आधुनिकीकरण केले आणि धरणाच्या पोटातील हजारो टन गाळ युद्धपातळीवर उपसून काढण्यात आला. यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता तर प्रचंड वाढली.
पण खरी अडचण पुढेच आहे. धरणात साठलेलं हे पाणी शहरात आणण्यासाठी पानवल धरणापासून ते नाचणे येथील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत (Water Purification Plant) १ किलोमीटर अंतराची मुख्य पाईपलाईन टाकणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र, धरण सज्ज असताना ही पाईपलाईन टाकण्याचं काम मात्र अजून सुरूच झालेलं नाही.
साडेचार कोटींचे बिल अडकले; ठेकेदाराने जोडले हात!
या संपूर्ण गोंधळामागे प्रशासकीय आणि आर्थिक नियोजनाचा मोठा अभाव दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, नियमाप्रमाणे पालिकेकडून या कामाचे थकीत बिल अद्याप मिळालेले नाही.
पुढील कामासाठी आवश्यक असलेले महागडे पाईप्स ठेकेदाराने स्वतःच्या खिशातून तब्बल १ कोटी रुपये खर्च करून वेगवेगळ्या ठिकाणी आणून ठेवले आहेत. परंतु, जुनी मोठी थकबाकी न मिळाल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या ठेकेदाराने पुढे काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जोपर्यंत हक्काचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, अशी भूमिका ठेकेदाराने घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून पाईपलाईनचे काम पूर्णपणे ठप्प आहे.
शहराचा भार आता शीळ धरण आणि एमआयडीसीवर
रत्नागिरी शहराची लोकसंख्या आजच्या घडीला साधारण ७६ हजार ते १ लाखाच्या घरात आहे. शहरात सुमारे ८ हजारांपेक्षा जास्त नळजोडण्या आहेत. पावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना जर हे पाईपलाईनचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर नगरपालिकेचा हा १६ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ कागदावरच राहण्याची भीती आहे. केवळ १ किलोमीटरच्या पाईपलाईन अभावी नागरिकांना पाण्यासाठी तरसावे लागणार आहे. अशा बिकट परिस्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला पुन्हा एकदा ‘शीळ धरण’ आणि ‘एमआयडीसी’ या पर्यायी स्रोतांवरच अवलंबून राहावे लागेल.
पालिका प्रशासनाचे काय म्हणणे आहे?
या वाढत्या वादावर आणि रखडलेल्या कामावर रत्नागिरी पालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की, “पानवल ते नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे पाईप टाकण्याचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले होते, हे खरे आहे. मात्र, आम्ही ठेकेदाराशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली असून, हा वाद लवकरच मिटवला जाईल. कामासाठी लागणारे पाईप्स आधीच जागेवर उपलब्ध आहेत, त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल आणि नागरिकांना पाणी मिळेल.”
आता प्रशासनाचे हे आश्वासन हवेतच विरते की खरोखरच रत्नागिरीकरांना या धरणाचे पाणी वेळेत मिळते, हे येणारा काळच ठरवेल.

