विधानसभा मतदार संघात पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला पूर्ण ताकदीनिशी आम्ही निवडून आणू . मतदार संघावर भगवा फडकविणारच, असा विश्वास ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी ठाकरेसेनेने निर्धार केला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून जो उमेदवार देण्यात येईल त्याचा प्रचार करून त्याला विजयी करू.
संपूर्ण तालुक्यात भगवी लाट असून कोणत्याही परिस्थितीत मतदार संघावर भगवा फडकविणार आहोत. यासाठी सर्व शिवसैनिक एकवटलेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. संपूर्ण मतदार संघात शिवसैनिकांनी एकनिष्ठेने काम केले. पक्षाने दिलेला आदेश पाळला त्यामुळेच माजी खासदार विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य देऊ शकलो. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. वातावरण ठाकरे शिवसेनेला पोषक आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल.
राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे रत्नागिरीतही बदल नक्कीच होईल. लोकांनी मानसिकता बदलेली असून ठाकरेसेनेच्या बाजूने सर्व लोकं उभी राहतील. दरम्यान, रत्नागिरी विधानसभेसाठी उमेदवार कोण असेल हे त्यांनी सांगितलेले नाही. उमेदवाराचा विषय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. रत्नागिरीतून विधानसभेला बंड्या साळवी यांच्यासह उदय बने इच्छुकांच्या यादीत आहेत. विधानसभेच्यादृष्टीने इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरवात केलेली आहे.