24 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriप्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर

कोणतीही गोष्ट तडीस न्यायची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. जर ध्येय डोळ्यासमोर असेल तर केलेल्या परिश्रमाचे सुद्धा चीज होते असे म्हणतात. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या व्यथा आणि कहाण्या असतात. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा काहीसा अनुभव पांगरी गिरेवाडीतील जाधव कुटुंबीय घेत आहे. गोष्ट आहे कोणत्याही यंत्राविना फक्त स्वकष्टाने खोदलेल्या ७० फूटी विहिरीची.

संगमेश्वरमधील पांगरी गिरेवाडीतील ग्रामस्थ दत्ताराम जाधव यांच्या कुटुंबीयांनी मिळून विशेष म्हणजे कोणत्याही यांत्रिक गोष्टीची मदत न घेता या लॉकडाऊनच्या काळामध्ये जाणवणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी स्वत: खोदकाम करून ७० फुट विहीर निर्माण केली आहे. विहिरीचे खोदकाम सुरु करताना पाणी लागेपर्यंत खोदकाम करत राहायचे, थांबायचे नाही हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली. पांगरी गिरेवाडीची ग्रामपंचायत पाणी योजना गेल्या वर्षभरापासुनच बंद असल्यातच जमा आहे. त्यामुळे उन्हाळाच्या हंगामाला मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. विशेषकरून महिला वर्गाला हंडाभर पाण्यासाठीही दूरवर डोंगरावर जाऊन पायपीट करावी लागते. त्यामुळे या समस्येचे कायमस्वरूपी उच्चाटण करण्यासाठी जाधव कुटुंबाने हा महत्वाचा निर्णय घेतला. विशेष करून कुटुंबातील महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन, त्यावर विचार विनिमय करून सर्वानुमते विहीर पाडण्याचा निर्णय घेतला.

   जाधव कुटुंबीयांनी पाणी लागण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून घरातील दहा जणांनी मिळून २०२० मधील मार्गशीर्षातील गुरुवारचा मुहूर्त धरून विहीरीचे खोदकाम करायला सुरुवात केली. कोणत्याही तांत्रिक मदतीशिवाय एवढ्या खोलवर खोदाई करणे म्हणजे मोठ्या जिकरीचे काम पण तरीही जिद्दीने त्यांनी काम सुरु ठेवले. ५० फुट खोदकाम केल्यानंतरही पाणी न लागल्याने काही प्रमाणात संभ्रमीत अवस्था निर्माण झाली होती, कुठेतरी निराशामय विचार सुद्धा मनात येत होते असल्याचे जाधव यांनी सांगितले. परंतु हार न मानता अजून २० फुट खोदाई केल्यानंतर विहिरीला पाणी लागले. ७० फुटावर लागलेल्या झऱ्याने सर्वांच्या डोळ्याचे काठ पाणावले. मेहनतीचे मिळालेले फळ पाहून सर्वाना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विहिरीचे पूजन करून पाण्याचा वापर करण्यास सुरुवात केली. या सगळ्या कार्यामध्ये जाधव कुटुंबियांमधील महिलांचा उस्फुर्तपणे सहभाग होता.

RELATED ARTICLES

Most Popular