बारसूवरुन सध्या रान पेटवलं जातंय. बारसूसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पत्र दिलं, असं सांगितलं जातंय. पण मी हे नाकारतच नाही. मी कुठे नाही म्हणतोय? मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष तेथील स्थानिकांवर तुमच्यासारखी अशी जोरजबरदस्ती केली नव्हती, असं सांगतानाच बारसूचा रिफायनरी प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारा आहे, तो प्रकल्प आम्हाला नको’, असं ठामपणे उद्भव ठाकरे यांनी सांगितलं. प्रकल्प जर चांगला आहे तर मग लोकांची डोकी का फोडत आहात? असा रोखठोक सवाल सरकारला करताना ‘जमिनी आमच्या आणि इमले तुमचे’ हे चालू देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गुरूवारी भारतीय कामगार सेनेच्या ५५ व्या सर्वसाधारण सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी संघटनेच्या मुख्य सल्लागारपदी उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली तर अध्यक्ष म्हणून खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या कारकीर्दीत विविध नेत्यांनी दिलेल्या योगदानाचा उद्भव ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी बारसू-सोलगांवमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

हो! पत्र दिलं पण… – ‘मी मुख्यमंत्री असताना बारसूबाबत पत्र दिलं होतं पण स्थानिकांशी गद्दारी केली नाही. मी तुमच्यासारखी स्थानिकांवर जबरदस्ती केली नाही. पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प आम्हाला नको. जर स्थानिकांच्या भल्याचा प्रकल्प असेल तर लोकांवर जबरदस्ती का करण्यात येतीये? असा सवाल करुन जमिनी आमच्या, इमले तुमचे हे कसे चालेल? असा परखड प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच मूळ मालकांकडून जमिनी दलालांच्या ताब्यात गेल्या आहेत त्यामुळे दलालांच्या होकाराला नागरिकांचा होकार समजू नका, असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. प्रकल्पाबाबतचं सत्य लोकांना कळलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

अन्याय जाळून टाकायचाय! – हे सरकार संवेदनशील नाही. लोकांच्या भल्याचं यांना काही पडलेलं नाही. पोलिसांकरवी अत्याचार सुरु आहे. कामगारांना गार करण्याचं यांचं धोरण आहे. त्यामुळेच मलासमाजातला अन्याय जाळून टाकायचाय, पक्षचिन्ह गेल्यावर मशाल चिन्ह मी उगाच घेतलं नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.

स्थानिकांची भूमिका तीच आमची – कुणाची सुपारी तुम्ही घेत आहात? जमिनी आमच्या आणि इमले तुमचे हे धोरण चालणार नाही. लोकांचा आवाज सरकारला ऐकावाच लागेल. बारसूत प्रकल्प नको ही स्थानिकांची भूमिका आहे, तीच आपल्या शिवसेनेची भूमिका आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सरकारच युनियन संपवायला लागले – शिवसेनेला ५६ वर्षे झाली आणि भारतीय कामगार सेनेला ५५ वर्षे झाली. ५५ वर्षांची होऊन देखील आपली भारतीय कामगार सेना अजून तरुण आहे. दत्ताजी साळवींसारखी निष्ठावंत लोक काही घेण्यासाठी आलीच नव्हती, देण्यासाठी आली होती. मुलुखमैदानी तोफ कशाला म्हणतात हे दत्ताजींची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनाच समजू शकेल. त्या काळी युनियन तुझी की माझी यावरुन मारामारी होत असे… आता युनियनच्या मारामाऱ्या संपल्या कारण सरकारच युनियन संपवायला लागले. हा पायंडा घातक आहे. सरकारच असं आहे की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा. प्रत्येकाचे दिवस नसतात, आपले दिवस गेलेत असं मी हणूच शकत नाही, आणायचेच! त्या वेळेला आपण जो काही प्रसाद देऊ, तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहिल, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

हे कसले बाळासाहेबांचे विचार? – केवळ ६० टक्के कामगार संघटित आहे, बाकीचे कामगार सर्व असंघटित आहेत. अडीच वर्षात आपण २५ मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणत होतो, काही आणली. त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवून नेले, ओरबाडून नेले, तरी शेपट्या घालुन आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार? ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला त्या भूमीपुत्रांवर अन्याय करुन येऊ घातलेले उद्योगधंदेबाजूला स्वतःच्या राज्यात नेत आहेत तरी शेपट्या यांच्या आत! हे कसले बाळासाहेबांचे विचार?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

बदला घेणारच उद्धव ठाकरे – उद्धव ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, येताना माहिती मिळाली, ती खरी का खोटी पहा, सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता, २३०० कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत! फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, महाराष्ट्राच होणार काय? ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा बदला घ्यायचाय, आणि तो घेणारचं, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.