रत्नागिरी तालुक्यात पर्यटकांचा ओढा ज्या मार्गावर सर्वाधिक असतो तेथील रस्ते चकाचक होऊ लागले आहेत: चाफे गणपतीपुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. जयगड- निवळी रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. आता याच रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत सविस्तर प्रकल्प तयार करण्यासाठी सुमारे ५३ लाख रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. निवळीकडून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्याचवेळी निवळी ते जयगड मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचीसुद्धा वर्दळ असते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने हे रस्ते चांगले असणे आवश्यक बनले होते. त्यानुसार पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने या रस्ता सुरक्षा कामाला चालना मिळाली आहे. चाफे गणपतीपुळे हा रस्ता यापूर्वीच झाला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सुमारे २५ कोटी रुपये निधीतून हा रस्ता यापूर्वीच अद्ययावत झाला आहे. जयगड- निवळी रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. त्याचवेळी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या कामासाठी ५३ लाख रुपये इतकी बजेटमध्ये तरतूद झाली आहे. या सर्वेक्षणानंतर येथील रुंदीकरण निकषात बसते की नाही हे कळणार आहे.