प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या सचिवांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याप्रकरणी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत लवकरच जिल्ह्यातील पाणलोट सचिव पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दापोली प्रकल्प क्र. ४७ व ४८ मिळून १६ पाणलोट समितीच्या १६ पाणलोट सचिवांचे मानधन ९ वर्षांपासून रखडले आहे.
शासन परिपत्रकानुसार योजनेतील पाणलोट सचिवांना दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत पत्रव्यवहार करुनही फक्त आश्वासन देऊन बोळवणं करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी पाणलोट क्षेत्राचे काम बंद करून नका, असे सांगत मानधन दिले. जाईल, असे सांगितले जात असल्यामुळे हे काम चालू ठेवले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून याबाबत समस्या मांडली होती. यादरम्यान समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तरीही अद्यापही हे मानधन मिळालले नाही. यामुळे मानधनापासून वंचित असलेले पाणलोट सचिव आक्रमक झाले आहेत. हे मानधन त्वरीत न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेऊन कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडणार असल्याचे पाणलोट सचिव सचिन शिर्के यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.