पीरलोटे येथील सुप्रिया कंपनीच्या जवळील परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एकजण जखमी झाला आहे. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर दोन्ही गटातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हाणामारी १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते. ३ वाजताच्या मुदतीत घडली आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निरंजन रमेश काळसेकर व त्यांचा भाऊ निखिल असे मोटारसायकलवरून चिपळूण येथे जात असताना समोरून मोटारसायकलवरून आलेले संशयित आरोपी केतन चाळके व अनिष आंब्रे (दोघेही रा. पीरलोटे, ता. खेड) यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबविल्यावर त्यांनी सांगितले की, धर्मेंद्रकुमार यांचा फोन आला होता, तू त्यांचा मोबाईल घेऊन का आलास, तेव्हा निखिल बोलला की, मोबाईल हा माझ्या नावावर आहे. तुला काय करायचे आहे असे बोलला, त्याचा आरोपी केतन याला राग आल्याने त्यांनी फिर्यादी निरंजन व त्यांचा भाऊ निखिल यांना हाताने मारहाण केली. तसेच संशयित आरोपी केतन चाळके याने तेथे जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादी निरंजन काळसेकर यांच्या डोक्यात उजव्या बाजूस मारून दुखापत केली. दोघांनी पुन्हा फिर्यादी निरंजन यांना पकडून तेथे असलेल्या हार्डवेअर दुकानाच्या बाहेरील लोखंडी चॅनलवर डोके आपटून दुखापत केली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
याप्रकरणी आरोपी केतन चाळके व अनिष आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परस्पर विरोधी फिर्याद धर्मेंद्रकुमार श्रीबालेश्वर सिंग (वय-२३, सध्या रा. पीरलोटे, ता. खेड, मूळ रा. बडाप, ता. अधावरा जि. भाबुक बिहार) यांनी, नोंदविली आहे. पोलीसांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, संशयित आरोपी निखिल काळसेकर व निरंजन काळसेकर हे फिर्यादी धर्मेंद्रकुमार यांच्या रूमवरती आले व त्यांना निखिल काळसेकर बोलू लागले की, तू केतन चाळके याला आमचे लेबर काढून देत आहेस त्यामुळे तू येथे थांबायच नाही. तू येथून बॅग भरून निघुन जायचे असे बोलून त्यांनी फिर्यादी धर्मेंद्रकुमार यांच्या हातामधील मोबाईल निखिल यांनी काढून घेतला व आरोपी काळसेकर यांनी हाताने फिर्यादी धर्मेंद्रकुमार यांच्या गालावर पाठीवर मारहाण केली व शिवीगाळी करून फिर्यादी धर्मेद्रकुमार यांचा मोबाईल घेऊन निघून गेले, म्हणून आरोपी निखिल व निरंजन काळसेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

