30 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

महानगर कंपनी’वर कारवाईचे संकेत…

महानगर गॅस कंपनीने शहरात केलेल्या खोदकामाचा मुद्दा...

रत्नागिरी न.प.च्या पहिल्याच सभेत सत्ताधारी नगरसेवक आक्रमक

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच...

सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री, आज शपथविधी?

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी...
HomeRatnagiriआंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

रेल्वे प्रशासनाने त्वरित 'जत्रोत्सव विशेष रेल्वे' सोडावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणचे ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा हा जत्रोत्सव ९ फेब्रुवारीला साजरा होत असून या सोहळ्यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ आणि प्रशासन युद्धपातळीवर तयारीला लागले आहे. जत्रोत्सवासाठी मंदिर परिसरात सध्या प्रचंड लगबग पाहायला मिळत आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, आणि शासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने जत्रापूर्व कामांना प्राधान्य दिले जात असून रस्ते, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यावर भर दिला जात आहे. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केल्याने परिसरात व्यापारी चैतन्य पसरले आहे. यावर्षी जत्रोत्सव सोमवारी असला तरी रविवारच्या सुटीला जोडून हा उत्सव येत असल्याने भाविकांचा आकडा लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी मंदिर परिसरात लाकडी पूल व दर्शन रांगेची व्यवस्था उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या नियोजन बैठकीत पालकमंत्री नीतेश राणे यांनी भाविकांच्या सुविधेला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदा अधिक पोलिस बळ तैनात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांतर्फे आरोग्य शिबिरे, मोफत सरबत वाटप आणि अन्य सेवाभावी उपक्रम राबवले जाणार आहेत. मंदिरावर केली जाणारी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास हे यंदाच्या जत्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे हा मुख्य आधार आहे. मात्र, जत्रेच्या कालावधीतील सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण सध्या ‘हाऊसफुल्ल’ असून वेटिंग तिकीट मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित ‘जत्रोत्सव विशेष रेल्वे’ सोडावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular