चिपळूणच्या भवितव्याच्या निर्णयाची निवडणूक आहे. विकासाची निवडणूक असून तुमचं मत म्हणजे विकासाला मत आहे. उर्वरित विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द द्यायला आलो आहे. आपण एकदा शब्द दिला की तो पाळतो, ते तुम्हांला माहित आहे. तेव्हा चिपळूणमधील महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून द्या, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात महायुतीच्या प्रचारसभेत केले. यावेळी सभेच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भाजप नेते प्रशांत यादव, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मतेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ जाधव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, सौ. स्वप्ना यादव, सौ. सीमा चव्हाण, शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, उपतालुकप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे, गुहागर तालुकाप्रमुख, दीपक कनगुटकर, राजेश बेंडल, उद्योजक वसंत उदेग, भाजप चिपळूण ग्रामीण मंडळ अध्यक्ष विनोद भुरण, उदय घाग तसेच चिपळूण-गुहागरमधील शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार तसेच युतीचे नगरसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून होता. आता देखील कार्यकर्ता म्हणून काम करतो, म्हणूनच कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आपण आलो आहे. हाच कार्यकर्ता आपल्याला मोठा करीत असतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण सर्व डोलारा सांभाळीत असतो. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपणं महायुतीच्या नेत्यांनी विश्वास दिल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. मात्र, मताधिक्य किती द्यायचे हे तुम्ही ठरवायचे आहे, असे स्पष्ट करताना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले. मुख्यमंत्री असो अथवा उपमुख्यमंत्री असो, विकासकामांसाठी किती निधी दिला याचा हिशोब ठेवत नाही. आपल्याला काय मिळाले यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळाले? काय मिळाले पाहिजे? याचा आपण सातत्याने विचार करतो. किती प्रॉपर्टी कमावली? किती पैसे कमावले? यापेक्षा किती माणसे कमावली? त्यांचं प्रेम किती मिळालं? याला आपण महत्व देतो, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आता गेल्या अडीच वर्षांपूर्वी केलेल्या विकासकामांमुळे महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. वर्षभरापासून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फंडणवीस महाराष्ट्राच्या हितासाठी काम करीत आहोत. राज्याला पुढे नेत आहोत. नुकतेच डावोसमध्ये ३० लाख कोटींच्या उद्योगासाठी करार झाले. कोकणात देखील मोठे प्रकल्प आले पाहिजेत. कोकणातील वाया जाणारे पाणी अडवले पाहिजे, यासाठी काम करणार आहोत. कोकणात समृद्धी महामार्गासारखा ग्रीन फिल्ड महामार्ग करणार आहोत, असे सांगताना कोकणच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात काजू, आंब्यासाठी महत्वाचा निर्णय झाला आहे. मत्स्य व्यवसायासाठी चालना दिली गेली आहे, असे ना. शिंदे यांनी यावेळी नमूद केले. यांच्यासह आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आता आम्ही झटतोय. दुर्दैवाने अजितदादा पवार आपल्यात नाहीत. ते म्हणायचे की, विकासकामांच्या पत्रावर सर्वात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते एकनाथ शिंदे असे ते बोलत. आपल्या सहीमुळे अनेकांचे जीव वाचवावेत, विकासकामे होऊदे.
मुख्यमंत्री सहाय्यत निधीतून ४६० कोटी रूपये दिले गेले. ७० ते ८० हजार रूग्णांना फायदा झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी लोकांचा जीव वाचवण्यासाठी वापरला पाहिजे, ही आपली भुमिका राहिली आहे, असे यावेळी ना. शिंदे यांनी नमूद केले. ते आणखी पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, नारायण तलाव, चिपळूण नगर परिषद नवीन इमारत यासह लोककल्याणकारी प्रकल्पांसाठी निधी दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, लखपती दिदी योजना, मुलींना मोफत शिक्षण, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, युवकांसाठी योजना, शासन आपल्या दारी या योजनेचा ५ कोटी लोकांना फायदा झाला. आरोग्य आपल्या दारी अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आम्ही खोटे आश्वासन देत नाही. प्रिंटींग मिस्टेक म्हणणार नाही. शेतकऱ्यांना देखील योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कदापि बंद पडणार नाही, असे स्पष्ट केले. जि.प., पं.स.च्या निवडणुकीत आपल्या हक्काचे उमेदवार निवडून देऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ना. एकनाथ शिंदे यांनी शेवटी दिली. कळवंडे धरणाच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असून आवश्यक तेवढा निधी दिला जाईल.
चिपळूण तालुक्यात जिथे भूस्खलन होते तिथे संरक्षक भिंती उभारल्या जातील, विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मी एकदा शब्द दिला की मागे येत नाही, असे सांगत त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले. या जाहीर सभेत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्याला कोणतेतरी काम द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तो धागा पकडून शिंदे यांनी सांगितले की, सदानंद चव्हाण यांना केवळ काम नव्हे तर मोठी जबाबदारी मिळेल असे स्पष्ट केले. यावेळी ना. उदय सामंत म्हणाले की, कोकण विभागातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीतं शिवसेनेचे वर्चस्व आपल्या नेतृत्वाखाली सिद्ध केलेले आहे. विधानपरिषदेचा एक आंमदार निवडून येईल, इतकी ताकद निर्माण झालेली आहे. यावेळी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या विजयासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांना तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन येईन, असा विश्वास योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

